आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:23 AM2021-09-24T04:23:26+5:302021-09-24T04:23:26+5:30
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची एकूण ६ हजार १८५ पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. यामध्ये गट क आणि ड ...
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची एकूण ६ हजार १८५ पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. यामध्ये गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला ८ आणि ९ सप्टेंबरला होणार होती. परंतु आता ही परीक्षा २५ सप्टेंबरला गट क आणि २६ सप्टेंबरला गट ड संवर्गासाठी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी परीक्षार्थींना ऑनलाइन प्रवेश पत्र मिळाले. मात्र प्रवेश पत्रावर थेट परीक्षा केंद्र जिल्हा नव्हे तर राज्याबाहेरील असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे अनेक परीक्षार्थींच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचे नावच नाही. त्यामुळे परीक्षार्थी चिंतेत पडले असून परीक्षा केंद्रावर कसे पोोहचावे, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची मानसिकता परीक्षार्थींमध्ये निर्माण झाली आहे. अनेक परीक्षार्थीकरिता उत्तर प्रदेश हे नवखे राज्य असून कोरोनाच्या काळात जाण्याकरिता अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक गरीब परीक्षार्थींना आर्थिक अडचण आहे. अशा परिस्थितीत परराज्यात परीक्षा केंद्र देण्याचा प्रकार गंभीर आहे.
परीक्षा प्रवेशपत्रावर उत्तर प्रदेशचे परीक्षा केंद्र नमूद आहे. त्यामुळे दीड दिवसात उत्तर प्रदेशात जाऊन परीक्षा केंद्र शोधायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-दत्ता रामेश्वर पातुरकर, परीक्षार्थी
शासनाने २०१८ पासून शासकीय भरती घेतली नाही. मला प्रवेशपत्र मिळाले, मात्र त्यावर परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता नाही.
-स्वप्निल ढोले, परीक्षार्थी