परीक्षार्थींचे आरोग्य बिघडले, हॉल तिकिटाचा गोंधळात गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:54+5:302021-09-25T04:18:54+5:30
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २५ आणि २६ सप्टेंबर रोजी गट क आणि गट ड प्रवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा ...
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २५ आणि २६ सप्टेंबर रोजी गट क आणि गट ड प्रवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. गट क प्रवर्गाची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असून, त्यासाठी २७ हजार ९८१ परीक्षार्थी पात्र ठरले आहे. या परीक्षार्थींना गुरुवारपासूनच हॉल तिकीट प्राप्त झाले आहेत, मात्र त्यामध्ये अनेक चुका आढळल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या प्रवेशपत्रावर फोटो नाही, तर काहींच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा घोळ दिसून येत आहे.
जिल्ह्यातील एकूण केंद्रे - ५५
परीक्षार्थी - २७,९८१
दोन सत्रात होणार परीक्षा
शनिवारी आयोजित गट क प्रवर्गाची परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात १६ हजार ४८९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत, तर दुसऱ्या सत्रात ११ हजार ४९२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
हॉल तिकिटांवर चुकाच चुका
आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेसाठी परीक्षार्थींना प्रवेशपत्र देण्यात आले, मात्र अनेकांच्या प्रवेशपत्रावर चुका असल्याचे दिसून आले. एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता चुकीचा आहेत, तर काही विद्यार्थ्यांना ‘टेक्स’ स्वरूपात प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. त्यावर परीक्षार्थींनी अपलोड केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरीदेखील नाही.
परीक्षार्थी चिंतेत
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मला प्रवेशपत्र प्राप्त झाले, मात्र त्यावर परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता नाही. त्यामुळे परीक्षा कोणत्या केंद्रावर द्यावी, ही समस्या आहे.
- स्वप्नील ढोले, परीक्षार्थी
परीक्षार्थींनी गोंधळून जाऊ नये. ज्या स्वरूपात प्रवेशपत्र प्राप्त झाले, ते घेऊन परीक्षा केंद्रावर जावे. सोबत परीक्षेसाठी केलेल्या अर्जाची प्रत आणि आधार कार्ड ठेवावे. तसेच कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. - डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ
चुका आढळल्यास परीक्षार्थींनी काय करावे?
परीक्षेच्या प्रवेशपत्रामध्ये चुका असल्यास गोंधळून जाऊ नका. प्रवेशपत्रासोबतच परीक्षार्थींनी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड तसेच परीक्षा अर्जाची प्रत सोबत ठेवावी. त्याची पडताळणी करून परीक्षार्थीला परीक्षेला बसविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.