अकोला शहरानजीक मातीचे उत्खनन; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:06 AM2017-12-01T01:06:00+5:302017-12-01T01:14:42+5:30
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्खननानंतर अवैध पावतीवर मातीची वाहतूक करून शासनाची फसवणूक केल्याने राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीच्या सुरपरवायझरसह चौघांविरुद्ध गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८ व ३९ मधील सरकारी जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. पुणे येथील राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत गायरान जमिनीवरील मातीचे उत्खनन करण्यात येत असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट खोल मातीचे उत्खनन करण्याची र्मयादा असताना, त्यापेक्षा जास्त खोल मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत आहे. यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गायरानातील माती उत्खननाची चौकशी २८ नोव्हेंबरपासूनच जिल्हा खनिकर्म अधिकार्यांमार्फत सुरू करण्यात आली. या चौकशीमध्ये उत्खननानंतर मातीची वाहतूक अवैध पावतीवर करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीचे चार ट्रक जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा भंग करून , माती वाहतुकीच्या परवाना पावतीमध्ये तारीख व वेळ याबाबतच्या उल्लेखात खाडाखोड करून, मातीची वाहतूक करीत शासनाची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राइट इन्फ्रास्टक्शन कंपनीच्या सुपरवायझरसह ट्रक चालक दादाराव गजानन सावंग (२४), सुरेश सीताराम कासदे (२४) व मनोज हसदा इत्यादी चौघांविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात भांदवि ३२0, ४६८, ४७१ (३४ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार झाले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
माती उत्खननाचे आजपासून मोजमाप
शिलोडाजवळील गायरान जमिनीवरील अवास्तव माती उत्खननाच्या चौकशीत माती उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. महसूल अधिकार्यांसह अभियंत्यांचा समावेश असलेल्या या पथकामार्फत शुक्रवारपासून माती उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे.