मृत कावळे आढळल्याने जिल्ह्यात खळबळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:42+5:302021-01-08T04:58:42+5:30
बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने सतर्कतेबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील दहीगाव गावंडे येथे मृतावस्थेत काही ...
बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने सतर्कतेबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील दहीगाव गावंडे येथे मृतावस्थेत काही कावळे आढळले. त्यामुळे दहीगाव परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांच्या माहितीवरून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी त्यांच्या पथकासह दहीगाव गावंडे येथे भेट दिली. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला असता, त्यांना केवळ एक पक्षी मृतावस्थेत सापडला, तर काही पक्ष्यांचे केवळ अवशेष आढळून आले. जिल्ह्यात अद्याप तरी बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे डॉ. बावणे यांनी पाहणी दरम्यान सांगितले.
प्रयोगशाळेत न पाठवता मृत पक्षी जमिनीत पुरला
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कुठलाही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे; मात्र पशूसंंवर्धन विभागाने मृत पक्ष्याला खड्डा करून जमिनीत पुरले. पक्ष्याचा मृत्यू होऊन एक दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्याला प्रयोगशाळेत पाठवून उपयोग नसल्याचे पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहीगाव गावंडे येथे आढळलेल्या मृत कावळ्याचा पंचनामा केला. त्या पक्ष्याचा मृत्यू होऊन एक दिवसापेक्षा जास्त काळ झाल्याने त्याला जमिनीत पुरले. पक्ष्याचा मृत्यू झाल्यावर काही तासांतच माहिती मिळाल्यास त्या मृत पक्ष्याची प्रयोगशाळेत तपासणी शक्य आहे. सध्यातरी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला.