जगातील चलनी नोटा, दुर्मीळ नाण्याच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:05 PM2018-04-18T14:05:01+5:302018-04-18T14:05:01+5:30
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात संपूर्ण जगातील देशांच्या चलनी नोटा व ऐतिहासिक दुर्मीळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले.
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात संपूर्ण जगातील देशांच्या चलनी नोटा व ऐतिहासिक दुर्मीळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. अक्ष करन्सीच्यावतीने अक्षय प्रदीप खाडे याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सतीश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्रात जे काही मोजके नाणे व नोटा संग्राहक आहेत. त्यांच्या यादीत अकोल्यातील अक्षय खाडेने बरेच वरचे स्थान मिळविले. मागील २४ वर्षांपासून तो हा छंद जोपासत आहे. अक्षयने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात जगामधील संपूर्ण देशाच्या चलनी नोटा, इंग्रजांच्या काळातील नोटांसह भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने क्रमाक्रमाने चलनात आणलेल्या सर्व नोटा, याशिवाय मोगल, मराठा, शिवकालीन, पेशवे, परमार, भोसले, यादव, गायकवाड, शिंदे, शाहू महाराज व त्यानंतरच्या इंग्रज राजवटीतील सर्व दुर्मीळ व ऐतिहासिक नाण्यांचा समावेश आहे. तसेच छपाईत चुका झालेल्या नोटा, फॅन्सी नंबरच्या नोटा, छपाई चुकलेले कलर आदींचाही या संग्रहात समावेश आहे.
नव्या पिढीतील युवकांना तसेच नागरिकांना स्वत:च्या देशाव्यतिरिक्त जगातील ऐतिहासिक दुर्मीळ नाणी जवळून बघता यावीत, या उद्देशाने अक्षयने या प्रदर्शनाचे आयोजन केले. आतापर्यंत त्याने महाराष्ट्रातील अनेक शहरे व गावांमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याशिवाय नकली नोटा कशा ओळखाव्या, नोटांची व नाण्यांची निर्मिती कशी होते. प्रत्येक मूल्याच्या नोटांवरील बारकावे, जागतिक स्तरावर प्रत्येक देशाच्या नोटांची स्थिती व त्याचे मूल्य याबाबत सविस्तर माहिती अक्षय प्रदर्शनातून देऊन अनोखा उपक्रम राबवित आहे.
अक्षयला आशय खाडे, निखिल देशमुख, अभिजित आखरे, आशिष गोसावी, श्रेयश सोनटक्के , नीरज घोगरे, हर्षल राठोड, विक्रांत पागृत, वीरेंद्र जाधव, तुषार घोडके, रवी नागापुरे, प्रतिक कटयारमल, शुभम हालोडकर, सूरज काळे यांनी सहकार्य केले. प्रदर्शनाला प्राचार्य डॉ. सतीश देशमुख, प्रा. मकवाना, प्रा. नरेंद्र बुजरू क, प्रा. रघुवीर मोरे, प्रा. राहुल फुके, प्रा. सातारकर, प्रा. पारसकर, प्रा.सुधीर ढोमणे, प्रा. अमित गावंडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन अक्षयचे कौतुक केले.