कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनाही दिसला कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 03:21 PM2019-07-26T15:21:24+5:302019-07-26T16:38:21+5:30
कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले.
अकोला: निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी प्रकाशित केल्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षणाचा दर्जा नाही. प्राचार्य-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.
कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि तेथील शेती, गायवाडा, कृषी अवजारे याचा आढावा घेतला. विद्यालयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, कर्मचारी व प्राचार्यांमध्ये टोकाचे वाद असून, समन्वय नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तसेच विद्यापीठाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांना दिसून आले. शेतीची पाहणी केली असता, ३३ हेक्टर शेतजमीन ही पडीत असल्याचे दिसून आले. सुपीक शेतीचा दर्जा खालावत असल्याचेही विनायक सरनाईक यांना दिसून आले. यासोबतच, त्यांनी निंबी मालोकार येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता, गावातील शेतकºयांनी त्यांच्या जमिनी कृषी तंत्र विद्यालयाला दान दिल्या; परंतु आता कृषी तंत्र विद्यालयाकडूनच त्यांना त्रास होत असल्याचे सांगितले.
गुरांना जखमा, वैरण घ्यावे लागते विकत
कृषी तंत्र विद्यालयाकडे सध्या ३६ गुरे आहेत. त्यात १0 बैल आहेत. यातील काही गुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या गुरांच्या चराईसाठी विद्यालयाकडे २४ एकर जमीन आहे. एवढी जमीन चराईसाठी उपलब्ध असताना आणि शेतीतील कुटार मोठ्या प्रमाणात निघत असताना, कृषी तंत्र विद्यालयाला गुरांसाठी वैरण विकत घ्यावे लागते.
शेती देखरेखीचा प्रभार ‘त्या’ प्राध्यापकाकडे कसा?
कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक यांनी भेटीदरम्यान प्राचार्यांकडून कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, विद्यालयातील अल्पदृष्टीबाधित प्राध्यापकाकडे शेती देखरेखीचा प्रभार असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्याकडे शेती देखरेखीचा प्रभार कसा दिला आहे, असा प्रश्नही सरनाईक यांनी उपस्थित केला.
काय आढळून आले...
कृषी विद्यापीठातील त्रिसदस्यीय समितीनेही केली चौकशी
कृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने गुरुवारी निंबी मालोकार येथे जाऊन प्राचार्य, प्राध्यापकांची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही माहिती जाणुन घेतली. ही समिती कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कृषी तंत्र विद्यालयातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मुलांना शिक्षण देणारी व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. शेतीसोबतच गुरांची अवस्था बिकट आहे. याकडे कृषी विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच अभ्यासू प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.
-विनायक सरनाईक, सदस्य
कार्यकारी परिषद, डॉ. पंदेकृवि.