महावितरणचा प्रभारी कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळय़ात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:19 AM2017-10-14T02:19:42+5:302017-10-14T02:20:10+5:30
वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणार्या महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी गोरक्षण रोड स्थित त्याच्याच कार्यालयात सापळा रचून रंगेहात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणार्या महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी गोरक्षण रोड स्थित त्याच्याच कार्यालयात सापळा रचून रंगेहात अटक केली.
अकोला येथील एका ४२ वर्षीय उप-कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून ‘एसीबी’ने शुक्रवारी हा सापळा रचला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने २४ दिवसांपूर्वीच ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्वीकारला होता. या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजुरी देण्याकरिता तसेच मागील सात दिवसांत बाळापूर, बाश्रीटाकळी उपविभागातील शेतकर्यांच्या कृषीपंपासाठी वीज जोडणीकरिता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरिता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १0 हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप-कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती. एसीबीने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गोरक्षण रोड स्थित कार्यकारी अभियंता कार्यालयात शुक्रवारी दुपारी १.१५ मिनिटांनी सापळा रचण्यात आला.
यावेळी जानोकार याने कंत्राटदाराकडून रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या अधिकार्यांनी झडप घालून जानोकारला ताब्यात घेतले. जानोकारकडून लाचेपोटी स्वीकारलेली १0 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याला अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस उप-अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
२४ दिवसांत अडकला दुसरा अधिकारी
महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदाराकडून ५0 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर उंबरकर याला २२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मूळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन जानोकार याला त्याच दिवशी अकोला ग्रामीण विभागाचा प्रभार सोपविण्यात आला होता. पदभार स्वीकारल्याच्या २१ व्या दिवशी गजानन जानोकार हादेखील लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या जाळय़ात अडकला.