कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही हवेत; नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:14 PM2018-09-09T13:14:23+5:302018-09-09T13:18:13+5:30
रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे.
अकोला : निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षांपासून रखडेले शहरातील नेकलेस रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिली; मात्र आठवडा उलटून गेला तरी, रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आला. आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहरातील सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक या ८१६ मीटर लांबी व १५ मीटर रुंदीच्या ‘नेकलेस’ रस्ता कामासाठी शासनामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना, गत दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू का करण्यात आले नाही, असा सवाल खा. संजय धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केला होता. या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम बाकी असल्याने रस्त्याचे काम सुरू होणे बाकी असल्याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर, या मुद्यावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरीत, काम केव्हा सुरू करणार, अशी विचारणा केली होती. त्यानुषंगाने नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींना दिली होती. आठवडा उलटून गेला; मात्र अद्यापही नेकलेस रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने, रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याची कार्यकारी अभियंत्यांनी लोकप्रतिनिधींना दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे.