दिव्यांगासह दुर्धर रूग्णांना कार्यालयातील उपस्थितीतून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:29 PM2020-06-13T17:29:41+5:302020-06-13T17:29:48+5:30
विकार असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचा आदेश ११ जून रोजी शासनाने दिला आहे.
अकोला : संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील उपस्थिती मर्यादित ठेवण्याचा आदेश शासनाने दिला. १ जूनच्या आदेशानुसार कार्यालयातील उपस्थिती १५ टक्के ठेवल्याने दिव्यांग, तसेच दुर्धर आजारी रूग्णांनाही कार्यालयात उपस्थिती बंधनकारक झाली. त्यामध्ये दुरूस्ती करत शासनाने सुट दिली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्र व राज्य शासनाकडून केल्या जात आहेत. सद्यस्थितीत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच भविष्यातील परिस्थिती पाहता सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांना घरी राहूनच कार्यालयीन कामकाजाचा आवश्यकतेनुसार निपटारा करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी इमेल, व्हाटसअॅपचा वापर शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरला आहे. त्यासोबतच आता दिव्यांगांसह ह्रदयविकार, श्वसनसंस्था विकार, मधुमेह यासारखे विकार असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचा आदेश ११ जून रोजी शासनाने दिला आहे.