अकोल्यात पवार 'पॉवर'चे प्रदर्शन; खासदार शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत
By Atul.jaiswal | Published: October 12, 2023 11:59 AM2023-10-12T11:59:06+5:302023-10-12T12:00:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे दीर्घ कालावधीनंतर गुरुवारी (१२ ऑक्टोबर) अकोल्यात आगमन झाले
अतुल जयस्वाल
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे दीर्घ कालावधीनंतर गुरुवारी (१२ ऑक्टोबर) अकोल्यात आगमन झाले असता, त्यांचे जल्लोषात स्वागत करून राष्ट्रवादी काँग्रेस व समर्थकांनी पवार 'पॉवर' चे प्रदर्शन घडविले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दुहीमध्ये अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य नेते व विशेषत: सहकार लॉबी शरद पवार यांच्या पाठीशीच कायम राहिली आहे. जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे बोट धरले असले तरी संपूर्ण जिल्हा मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे या जल्लोषातून दाखवून देण्यात आले.
अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी स्व. डाॅ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब काेरपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित सहकार महामेळाव्यासह विविध कार्यक्रमांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गुरुवारी सकाळी विमानाद्वारे अकाेल्यात आगमण झाले. विमानतळावरून त्यांचा ताफा कौलखेड येथे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाला. कौलखेड चौकात शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर शरद पवार यांचा ताफा सहकार महामेळाव्याच्या आयोजनस्थळाकडे रवाना झाला. वाटेत अशोक वाटीका येथे थांबून पवार व सोबतच्या मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून वंदन केले. त्यानंतर पवार हे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होत असलेल्या सहकार महामेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
गेल्याच आठवड्या अजीत पवार गटाचे नेते व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अकोला, बुलढाणा, वाशिम येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन आढावा घेतला. त्यानंतर थेट शरद पवार यांनी अकोला दौरा केल्याने या गटाच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. शरद पवार यांचा ताफा कौलखेड मार्गे मुख्य कार्यक्रमाकडे रवाना होत असताना रस्त्यात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर स्व. कोरपे स्मृतीदिनाचा मुख्य कार्यक्रम होत असून, तेथे व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष संतोषदादा कोरपे, श्रीधरराव कानकिरड, महादेवराव भुईभार, डॉ. कोरपे आदी मान्यवर उपस्थित आहेत.