विदर्भात विदेशी मत्स्य प्रजातींचा प्रसार
By admin | Published: February 13, 2016 01:54 AM2016-02-13T01:54:26+5:302016-02-13T01:54:26+5:30
पर्यावरण बदल पथ्यावर: स्थानिक मासेमारांवर उपासमारीची वेळ.
दादाराव गायकवाड/ कारंजा लाड: एकिकडे सततच्या अवर्षणामुळे मासेमारी हा व्यवसाय मोठय़ा संकटात असतानाच, विदर्भात काही विदेशी प्रजातींचा प्रसार वाढला आहे. त्यामुळेच विदर्भासह देशभरातील स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत असून, त्याचा स्थानिक पर्यावरणावरही वाईट परिणाम होत असल्याचे मत पर्यावरण आणि मत्स्य अभ्यासकांनी मांडले आहे. भारतातील मत्स्य सृष्टीला विदेशी मत्स्य प्रजातींमुळे प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. विदर्भापुरता विचार केला तर आज विदर्भात पाच प्रकारच्या विदेशी मत्स्य प्रजाती पर्यावरणात सोडण्यात आल्या आहेत. त्यात चंदेरा, तिलापिया, सायप्रिनस, आफ्रिकन मागुर, गप्पी यांचा समावेश होतो. विदर्भात आणि इतर ठिकाणीसुद्धा सायप्रिनस नावाचा मासा मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जातो. याच सायप्रिनस मत्स्य प्रजातीने काश्मीर खोर्यातील सिजोथोरॅसिनी नावाच्या स्थानिक मत्स्य प्रजातीच्या एका मोठय़ा गटालाच संपवून टाकलं आहे. दुसरी प्रजाती म्हणजे सिल्वर कार्प (चंदेरा) ही प्रजातीसुद्धा आपल्याकडे मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाते. या मत्स्य प्रजातीनेसुद्धा गोविंदसागर आणि अन्य अनेक जलाशयातील कटला या स्थानिक मत्स्य प्रजातीला संपवून टाकले आहे. पर्यावरण तज्ज्ञ तथा मत्स्य अभ्यासक डॉ. नीलेश हेडा यांना २00३ च्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील कठाणी नदीत पूर्व आफ्रिकेतल्या नद्यांमध्ये आढळणारा तिलापिया नावाचा मासा आढळून आला. स्थानिक मत्स्य प्रजातींचा कर्दनकाळ हा मासा असल्याचे त्यांना कळले. १९५२ मध्ये हा मासा भारतात सोडण्यात आला होता. आता याची प्रजाती सगळीकडेच पसरली आहे. हा मासा आपल्या पिलांची काळजी घेतो. आपल्या पिलांना तोंडात ठेवतो. तो इतर माश्यांची अंडी खातो. कोणत्याही परिस्थितीत जगतो. त्यावर रोग येत नाही. त्यामुळे घोगर, जरांग, कडू, पिंजर आणि तंबू या स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत आहेत.