कपाशीच्या एकरी १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा!
By admin | Published: November 22, 2014 11:59 PM2014-11-22T23:59:43+5:302014-11-23T00:02:45+5:30
युरोप खंडात प्रचलित कमी अंतरावरील सघन लागवड पध्दतीचा अवलंब.
हर्षनंदन वाघ/बुलडाणा
पावसाला उशीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, युरोप खंडात प्रचलित सघन लागवड पद्धतीचा वापर करण्याच्या, जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकर्याच्या प्रयोगाला चांगले यश लाभले असून, एकरी तब्बल १५ क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
बुलडाणा तालुक्यातील तराडखेड येथील प्रयोगशील शेतकरी डॉ. हासनराव देशमुख यांनी त्यांच्या शेतात नेहमीच कापूस लागवडीचे विविध प्रयोग केले आहेत. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे कपाशीची उशिरा लागवड केली तर झाडांची जास्त वाढ होणार नाही हे हेरून, डॉ. देशमुख यांनी युरोप खंडात वापरल्या जाणार्या पद्धतीप्रमाणे, कमी अंतरावरील सघन लागवड पध्दतीचा अवलंब करून, २ बाय १ फूट अंतरावर बीटी कपाशीची लागवड २0 जुलै रोजी केली. कापूस वेचायला जागा रहावी म्हणून, प्रत्येक चार ओळींनंतर सोयाबीनची एक ओळ लावली. सोयाबीन निघाल्यानंतर त्या मोकळ्या जागेतून कापूस वेचणी सुलभ व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. दोन ओळीतील व दोन झाडामधील अंतर कमी असल्यामुळे रासायनीक खताची मात्रा, शिफारशीच्या एक-तृतियांश वापरली. हा प्रयोग दोन एकर क्षेत्रावर करण्यात आला. सोयाबीन निघाले असून, तीन क्विंटल उत्पादन झाले आहे. सद्य स्थितीत कपाशीच्या झाडांना सरासरी ३0 पक्व बोंड लागली असून, पाला व फुले भरपूर असल्यामुळे, आणखी १५ ते २0 बोंड पक्व होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक बोंडाचे वजन ५ ते ६ ग्रॅम आहे. त्यामुळे या प्रयोगात एकरी किमान १५ क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. परिसरातील ज्या इतर शेतकर्यांनी २0 जुलैच्या आसपास लागवड केली, त्यांना कापसाचे कमाल उत्पादन १0 क्विंटलपेक्षा जास्त होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे डॉ. हासनराव देशमुख यांनी केलेला, उशिरा लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देत आहेत.
बुलडाणा तालुक्यातील तराडखेड गाव बुलडाण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असून, शेतकर्यांच्या आग्रहास्तव बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी शेतात मार्गदर्शन कार्यशाळा ठेवण्यात आली असल्याचे डॉ. हासनराव देशमुख यांनी सांगीतले.