अकोल्यात देशी बीजी 2 कापसाच्या बियाण्यांची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 02:15 PM2017-07-29T14:15:22+5:302017-07-29T14:17:00+5:30
देशी बीजी-२ (बीटी) कापसाच्या बियाण्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यंदा चाचणी घेण्यात येत आहे.
अकोला, दि. 29 - देशी बीजी-२ (बीटी) कापसाच्या बियाण्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यंदा चाचणी घेण्यात येत आहे. येथे पेरण्यात कापसाचे पीक आता दीड महिन्याचे झाले असून या कापसाला पात्या, फुले येऊ लागली आहेत. चाचणी पूर्ण झाल्यानंतर बियाणे शेतक-यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता.
या पिकांची वाढ पाऊस नसताना सुक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर झाली असून हे झाड दोन फुटाचे झाले आहे. या पिकांची अवस्था परिपक्वतेकडे होत असून पात्या, फुले धरण्याची अवस्था निर्माण होत असल्याचे या विभागाचे प्रमुख शंकरराव देशमुख यांनी सांगितले. या संशोधनावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत असून वरिष्ठ शास्त्रज्ञ, संचालकांची येथे वर्दळ असते.