अकोल्यातील शेतकऱ्याचा काजू उत्पादनाचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 04:00 PM2019-03-26T16:00:45+5:302019-03-29T18:33:20+5:30
अकोला: अठ्ठेचाळीस अंश सेल्सीअस तापमान असलेल्या अकोला परिसरात काजू उत्पादन करण्याचा अभिनव प्रयोग येथील प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी यशस्वी केला आहे.
- संजय खांडेकर
अकोला: अठ्ठेचाळीस अंश सेल्सीअस तापमान असलेल्या अकोला परिसरात काजू उत्पादन करण्याचा अभिनव प्रयोग येथील प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी यशस्वी केला आहे. काजूसाठी दमट आणि थंड हवामान आवश्यक असतानाही चांडक यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर आता ते काजूची शेती करण्याच्या तयारीत आहे.
पंधरा दिवसांआधी अकोला एमआयडीसी असोसिएशनच्या पुढाकारात अन्न प्रक्रिया या संदर्भात कार्यशाळा झाली. कास्तकारांनी परंपरागत शेतीसोबतच बदल आणि अन्न प्रक्रिया साखळीचे उद्योग निवडले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी ही कार्यशाळा घेतली गेली. त्यामध्ये कुंभारी येथील सधन आणि प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी हजेरी लावली. शेतात पिकविलेले ओले काजू त्यांनी या कार्यशाळेत आणले. हा प्रयोग अकोला परिसरात झाला यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता, अखेर एका चमूने कुंभारीच्या शेतात भेट देऊन काजू उत्पादनाची पाहणी केली. त्यानंतर या चमूने चांडक यांना हा प्रयोग कसा यशस्वी केला, याबाबत विचारणा केली असता, चांडक यांनी अभिनव प्रयोगाची माहिती सांगितली. तीन वर्षांपूर्वी चांडक कोकणात गेले होते. येथून त्यांनी केसर आणि काजूची रोपे सोबत आणली. त्यांनी कुंभारी येथील शेतात या रोपांची लागवड केली. गत दोन वर्षांपासून या रोपांना नियमित काजू लागत आहेत.
काजूसाठी दमट आणि थंड हवामान आवश्यक असते. आपल्याकडील उष्ण कटिबद्ध परिसरात, कृत्रिम पद्धतीचे वातावरण निर्मिती करून काही रोपे जगविता येऊ शकतात; मात्र कोकण परिसरासारखे मोठ्या प्रमाणात पीक आपल्याकडे घेणे अशक्य आहे.
-डॉ. सुभाष टाले, जल व कृषी तज्ज्ञ. अकोला.
कुंभारी परिसरात माझी १८ एकर मुरमाळ जमीन आहे. गत अनेक वर्षांपासून मी सेंद्रिय पद्धतीचे पीक घेत असून, डाळिंबची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या शेतातील डाळिंबांना मोठी मागणी आहे. यासोबतच काजू, केसर आंबा, आवळा, मोसंबी, संत्रे, चिक्कू, सीताफळ, रामफळ आदी फळ लागवडीचे प्रयोग मी सातत्याने करीत आहे.
-द्वारकादास चांडक, शेतकरी-उद्योजक, कुंभारी, अकोला.