हायस्पीड ट्रेनकरिता स्पेनमधील तज्ज्ञांनी केली अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी
By admin | Published: March 9, 2016 02:20 AM2016-03-09T02:20:37+5:302016-03-09T02:20:37+5:30
पहिल्या टप्प्यात स्पेनच्या तज्ज्ञांनी अकोला रेल्वे स्थानकाची आवश्यक माहिती संकलित केली.
अकोला: मुंबई-नागपूरदरम्यान हायस्पीड कॉरिडॉर रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रकल्प भारतीय रेल्वेने हाती घेतला असून, या मार्गावर भविष्यात धावणार्या हायस्पीड ट्रेनसाठी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी स्पेनच्या तज्ज्ञांनी मंगळवारी केली. पहिल्या टप्प्यात स्पेनच्या तज्ज्ञांनी अकोला रेल्वे स्थानकाची आवश्यक माहिती संकलित केली. नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात देशातील काही प्रमुख शहरांदरम्यान हायस्पीड ट्रेन चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेस मूर्त रूप दिले जात आहे. त्या अनुषंगाने देशात हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानके व रेल्वे मार्गांंचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यास अनुसरून चार स्पॅनिश विशेषज्ञांची एक चमू मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचली. यामध्ये जॉकीन लिमेंझ, ओट्रो सॉब्रिओ, अल्बटरे मॉस्टिनो व कार्लस विशेषज्ञाचा समावेश होता. अकोल्याचा भूगोल, इतिहासासहित या चमूने अकोल्याची लोकसंख्या, अकोला मार्गे आवागमन होणार्या गाड्यांची संख्या व त्यांची माहिती, तसेच राष्ट्रीय महामार्गाशी निगडित सर्व माहितीचे संकलन केले. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील नव्या आणि जुन्या बससस्थानकांचीदेखील पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली. अकोल्यात दाखल होण्यापूर्वी या चमूने अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचीही पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत सिनिअर डीसीएम सुनील आर. मिश्रा, डीओएम डॉ. स्वप्निल नीला व अकोला रेल्वे स्थानक प्रबंधक एम. के. पिल्ले, अभियंता रायबोले, आरपीएफ पोलीस निरीक्षक राजेश बडे व सीआई महेश निकम आदि उपस्थित होते.