मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!
By admin | Published: July 5, 2017 12:51 AM2017-07-05T00:51:14+5:302017-07-05T00:51:14+5:30
जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात ३११ गावांमध्ये प्रस्तावित ३११ उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत गत उन्हाळ्यात विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी ३११ गावांमध्ये १९८ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १३९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची स्थिती आहे.
पावसाळ्यातही अनेक गावांत पाणीटंचाई!
पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
आराखडा २५ कोटींचा; कामे ३८ लाखांची!
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या १९८ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला; मात्र अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ५९ उपाययोजनांच्या कामांवर केवळ ३८ लाख ४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.