१८.६७ लाखांची वीज चोरी उघड
By admin | Published: March 17, 2017 03:06 AM2017-03-17T03:06:45+5:302017-03-17T03:06:45+5:30
महावितरणच्या विशेष भरारी पथकांची कारवाई
अकोला, दि. १६- महावितरणच्या पाच विशेष भरारी पथकांनी गत आठवड्यात जिल्हय़ात विविध ठिकाणी राबविलेल्या अभियानात एकूण १८ लाख ६७ हजारांची वीज चोरी उघडकीस आली आहे. या कारवाईत ५७ जण थेट वीज चोरी करताना आढळून आले असून, महावितरणने त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणे अपेक्षित असते; परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणे आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक विजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येते. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम व वर्धा येथील पाच विशेष भरारी पथकांनी गत ६ ते १0 मार्च २0१७ या कालावधीत जिल्हय़ात विविध ठिकाणी छापे टाकून ८९ वीज ग्राहकांच्या जोडण्यांची तपासणी केली. या मोहिमेत ५७ ग्राहकांकडे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. यापैकी ५३ वीज ग्राहक वीज कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत (थेट वीज चोरी) दोषी आढळून आले. त्यांनी वापरलेल्या विजेचे मूल्यमापन केले असता, त्यांनी १६ लाख ६७ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन ग्राहकांकडे २ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. अकोला परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता, प्रभारी उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) नागपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अकोला उपविभागातील अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.