हिंगणी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; तीन घरांना आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:17 PM2020-09-15T19:17:28+5:302020-09-15T19:17:38+5:30
हिंगणी बु.येथील मंगला शेषराव कोरडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
तेल्हारा : तालुक्यातील हिंगणी बु. येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातील गॅस सिलिंडर फुटल्याने स्फोट झाला. यामुळे तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविले. आगीत घरांमधील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.
हिंगणी बु.येथील मंगला शेषराव कोरडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे घरातील वस्तूंनी पेट घेतला. घर माती व लाकडाचे (धाब्याचे) असल्याने घराने सुद्धा पेट घेतला. एवढेच नाहीतर शेजारी राहणारे माणिकराव सदाशिव कोरडे व गोपाल विषवनाथ कोरडे यांचीही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. वेळेवर तेल्हारा येथील नगर परिषद अग्निशमन दलाचा बंब पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र तोपर्यंत मंगला कोरडे यांचे घर पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीत घरातील नगदी पन्नास हजार व कागदपत्रे जळाली. तसेच शेजारील दोन घरांमधील जीवनाशयक वस्तू व धान्य जळाले. घरांना मोठी झळ पोहचल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदारांना सरपंच हरिदास वाघ यांनी आग लागल्याची माहिती दिली. तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी तातडीने अग्निशमन दलाची बंब पाठवून तलाठ्याला पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनाघटनेची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पीडितेला महिलेला आर्थिक मदत दिली. यावेळी सरपंच हरिदास वाघ उपस्थित होते.