जनता भाजी बाजारातून व्यावसायिकांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:43+5:302021-04-24T04:18:43+5:30
राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यामध्ये भाजीपाला, फळ, किराणा दुकाने ...
राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यामध्ये भाजीपाला, फळ, किराणा दुकाने व कृषिसेवा केंद्रांसह औषधी विक्रेता, दूध डेअरी आदींचा समावेश आहे. शहरात काेराेनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाल्यामुळे घराेघरी काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्यान, मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजारातून काेराेनाचा प्रसार हाेत असल्याची सबब पुढे करीत २ मेपर्यंत जनता भाजी बाजारात किरकाेळ भाजीपाला व फळ विक्रीला मनाई केली आहे, तसेच यापुढे भाजीपाल्याची हर्रासी लाेणी राेडलगतच्या महात्मा फुले भाजी बाजारात करण्याचे आयुक्तांचे स्पष्ट निर्देश आहेत. या संदर्भात आयुक्तांनी २२ एप्रिल राेजी आदेश जारी केल्यानंतर, शुक्रवारी सकाळी ७ वाजता आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजार व परिसराची पाहणी केली.
व्यावसायिकांना हुसकावले!
मनपा प्रशासनाच्या निर्देशानंतरही जनता भाजी बाजार व जुना भाजी बाजारात शुक्रवारी सकाळी काही व्यावसायिक दाखल झाले हाेते. संबंधितांना मनपाच्या बाजार व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी हुसकावून लावले.
भाटे क्लब व बाजाेरिया मैदानात बाजार
जैन मंदिर परिसरातील जुना व जनता भाजी बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना भाटे क्लबच्या मैदानात व फळ विक्रेत्यांना बाजाेरिया मैदानात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली़ शुक्रवारी सकाळी या ठिकाणी तुरळक संख्या असलेल्या व्यावसायिकांनी व्यवसाय केल्याचे दिसून आले.
२ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची ‘ड्युटी’
शहरातील जनता भाजी बाजार व जुना भाजी बाजारात २ मेपर्यंत किरकाेळ व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाजारात काेणीही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना हुसकावून लावण्यासाठी मनपा आयुक्तांनी बाजार व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना २ मेपर्यंत कर्तव्य बजावण्याचे निर्देश दिले आहेत.