बाजार समित्यांचा अभ्यास करणा-या समितीस मुदतवाढ
By Admin | Published: August 25, 2015 01:52 AM2015-08-25T01:52:18+5:302015-08-25T01:52:18+5:30
समिती आता तिचा अहवाल ३१ ऑगस्टपूर्वी शासनाला सादर करणार.
बुलडाणा : राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणार्या अडत, तोलाई आदी मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या समितीस शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ही समिती आता तिचा अहवाल ३१ ऑगस्टपूर्वी शासनाला सादर करणार आहे. ३0 मार्च २0१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील बाजार समित्यांमध्ये आकारल्या जात असलेल्या अडत व तोलाईच्या दरासंदर्भात, तसेच अडत व तोलाई कुणाकडून वसूल करावी याबाबत शासनास अभ्यास करुन मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समिती गठीत करण्यात आली होती. ही समिती आपला अहवाल ३१ मे २0१५ पूर्वी शासनास सादर करणार होती; मात्र समितीस विहीत कालावधीत आपला अहवाल सादर करणे शक्य झाले नसल्यामुळे समितीच्या विनंतीनुसार ३१ जुलै २0१५ पर्यंंंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. समितीमध्ये समाविष्ट विधानसभा सदस्य विधीमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याने समितीची सभा घेता आली नाही. त्यामुळे समिती अध्यक्षांनी समितीस आणखी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती केली होती. त्यानुषंगाने सदर समितीस ३१ ऑगस्ट २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने २४ ऑगस्ट रोजीच्या निर्णयान्वये दिला आहे.