तक्रारी असलेल्या कंपनीलाच मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:45+5:302021-04-02T04:18:45+5:30
अकोला : महानगरपालिकेत दैनंदिन कामासाठी कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीविराेधात तक्रारी असल्याने या कंपनीला मुदतवाढ देण्यात येऊ नये, असा आक्षेप ...
अकोला : महानगरपालिकेत दैनंदिन कामासाठी कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या कंपनीविराेधात तक्रारी असल्याने या कंपनीला मुदतवाढ देण्यात येऊ नये, असा आक्षेप शिवसेनेने घेतल्यानंतर फेरनिविदा बाेलाविण्याचे आश्वासन स्थायी समिती सभापतींनी दिले. दरम्यान, केवळ एकच निविदा आल्यामुळे या कंपनीला तांत्रिक कारणांमुळे मुदतवाढ देण्यात आली आहे
अकोला महानगरपालिका प्रशासनाला १६८ कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या साहिल इंडस्ट्रिजकडून कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी उघड करून या कंपनीविराेधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. साहिल इंडस्ट्रिज या कंपनीच्या कंत्राटाची मुदत संपत आल्याने नव्याने ई-निविदा मागविण्यात आल्यात. त्यात ‘क्षितिज’ या एकाच कंपनीची निविदा आल्याने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतरही एकच निविदा असल्याने अखेर गुरुवारी दुपारी ३ वाजता आयोजित सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यावर गदाराेळ झाला मिश्रा यांच्या आक्षेपानंतर सभापती संजय बडोणे यांनी यापूर्वी कंपनीला दिलेल्या कामानंतर ऑडिट आक्षेप नोंदविण्यात आले होते, असे सांगून निविदा मंजूर न करता फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असे स्पष्ट केले. शिवाय जोपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यमान कंपनीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेत या संदर्भात तक्रार करणार असल्याचे सांगितले. या वेळी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य मो. इरफान यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून निविदा मंजुरीचा ठराव राज्य शासनाकडे विखंडासाठी पाठविण्याची मागणी केली.