शाळा बंद आंदोलनास दुस-या दिवशीही व्यापक प्रतिसाद
By admin | Published: December 11, 2015 02:39 AM2015-12-11T02:39:01+5:302015-12-11T02:39:01+5:30
अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यात बंद राहिल्या खासगी शाळा.
अकोला : शिक्षण संस्था व शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ९ व १0 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या खासगी शाळा बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतांश शाळा अध्यापनाच्या दृष्टीने बंद राहिल्या. मात्र, बहुतांश शाळांमध्ये शिक्षक हजर होते. शासनाच्या शिक्षण व शिक्षकांच्या हितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षण बचाव कृती समितीतर्फे आयोजित या शाळा बंद आंदोलनाच्या काळात गुरुवारीदेखील शाळांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित होते. मात्र, शिक्षक शाळेत हजर होते. मूर्तिजापूर तालुक्यात या आंदोलनात संस्थाचालक संघाचे शिरीष तिडके, रमेशचंद्र कुर्मी, ह.बा. खंडारे, संजय तायडे, अँड. शेख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे सोपान ढाकुलकर, राजेश पाथोडे, मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख, प्राचार्य एस.एल. रनबावळे आदींनी पुढाकार घेतला होता. सलग दुसर्या दिवशी शाळा बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. बाळापूर तालुक्यात शाळा बंद आंदोलनात दुसर्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाळा बंद आंदोलन असल्याचे माहीत झाल्याने विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. शिक्षण संस्थाचालकांच्या या शाळा बंद आंदोलनात शिक्षक मात्र सहभागी नसल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनामुळे शाळेतील अध्यापन बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. व्यवस्थापनाच्या मागण्यांसाठी केल्या जाणार्या या शाळा बंद आदोलनात विद्यार्थी नाहक भरडला जात आहे. मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्याप्रमाणेच आकोट, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व अकोला तालुक्यातदेखील शाळा बंद आंदोलनास व्यापक प्रतिसाद मिळाला.