प्रदीप वखारियासह दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:18 PM2018-10-13T13:18:44+5:302018-10-13T13:18:55+5:30
अकोला : आदर्श कॉलनीतील रहिवासी काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप पोपटलाल वखारिया व त्याचा साथीदार श्रीकांत भगवानदास पटेल या दोघांनी अकोला ...
अकोला : आदर्श कॉलनीतील रहिवासी काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप पोपटलाल वखारिया व त्याचा साथीदार श्रीकांत भगवानदास पटेल या दोघांनी अकोला आॅइल इंडस्ट्रीजच्या जागेसंदर्भात न्यायालयात आणि पोलिसांत केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी अॅड. व्ही. पी. नंद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार १० आॅक्टोबर रोजी घडला. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कामगार संघाचे पदाधिकारी नसतानाही प्रदीप पोपटलाल वखारिया व श्रीकांत भगवानदास पटेल या दोघांनी अकोला आॅइल इंडस्ट्रीजच्या जमिनीसंदर्भात रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयात काही प्रकरणे प्रलंबित असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विविध प्रकारच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. यामधील बहुतांश तक्रारींवर न्यायालयाने निकाल दिला असून, हे निकाल प्रदीप वखारिया याच्याविरोधात लागलेले आहेत. त्यामुळे प्रदीप वखारिया याने पोलिसांत तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या काही तक्रारी मागे घेण्यासाठी अॅड. व्ही. पी. नंद यांच्या बिर्ला गेट परिसरातील निवासस्थानी जाऊन त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बरे-वाईट करण्याची धमकीही प्रदीप वखारिया व श्रीकांत पटेल या दोघांनी दिली. या प्रकरणाची तक्रार नंद यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ करीत आहेत.