‘त्या’ अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:24 AM2017-10-11T01:24:52+5:302017-10-11T01:25:45+5:30
अकोला : मराठी शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर आता अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणारे शिक्षक, त्यांचे विषय, आरक्षण आणि शाळेतील रिक्त पदांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. शिक्षण संचालकांकडून सूचना आल्यानंतर लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी प्रकाशित करून, त्यांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मराठी शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर आता अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणारे शिक्षक, त्यांचे विषय, आरक्षण आणि शाळेतील रिक्त पदांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. शिक्षण संचालकांकडून सूचना आल्यानंतर लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी प्रकाशित करून, त्यांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
राज्यभरामध्ये माध्यमिक मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवून ठेवण्यात आली होती. मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आटोपल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरू शकणार्या शिक्षकांची माहिती मागविली आहे. एक-एक अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची एकूण संख्या, रिक्त पदे, आरक्षण आणि विषयनिहाय शिक्षकांची संख्या आदी माहिती संकलनाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये अल्पसंख्याक शाळांमधील माहितीचे संकलन पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी मान्यतेसाठी पुणे येथील शिक्षक संचालकांकडे पाठविण्यात येईल. तेथून यादीला मान्यता मिळाल्यानंतर शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करून, शिक्षकांच्या हरकती मागविण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यानंतर हरकती नोंदविणार्या अतिरिक्त शिक्षकांसह संस्थाचालक, मुख्याध्यापकांसमक्ष सुनावणी घेण्यात येईल आणि मग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
असे होईल जिल्हय़ांतर्गत समायोजन
अनुदानित खासगी प्राथ., उच्च माध्य. व माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे प्रथमत: खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये समायोजन होईल. अनुदानित खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये समायोजनासाठी जागा रिक्त नसल्यास अनुदानित खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जि.प., न.पा., न.प., मनपा शाळांवर करण्यात येईल. या ठिकाणीही जागा रिक्त नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अनुदानित खासगी शाळांमध्ये होईल. जिल्हय़ांतर्गत समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक शिल्लक असतील, तर त्यांचे १ ते ४ टप्प्यांनुसार विभागांतर्गत समायोजन होईल. सेवाज्येष्ठता आणि विषयाची आवश्यकता लक्षात घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल.
तर वेतन अदा होणार नाही!
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही हे शिक्षक समायोजित ठिकाणी रुजू झाले नाहीत, अशा शिक्षकांना वेतन देऊ नये. अतिरिक्त शिक्षकाला रुजू करून घेण्यास नकार देणार्या शाळेचे पदसुद्धा रद्द करून शालार्थ प्रणालीतून काढून टाकण्याचा आदेशही शासनाने दिला आहे.
सध्या अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची, रिक्त पदांची माहिती मागविणे सुरू आहे. पूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी