२१ गावांमध्ये १,३३0 रुग्णांची नेत्र तपासणी
By admin | Published: April 29, 2017 07:16 PM2017-04-29T19:16:45+5:302017-04-29T19:16:45+5:30
एप्रिल महिन्यात अनेक गावांत नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्रोपचार केले.
रोटरीचे फिरते नेत्र तपासणी अभियान: ३७१ जणांना चष्मे, ४१ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड
अकोला : गत सात वर्षांपासून फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणार्या रोटरी फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने या एप्रिल महिन्यात अनेक गावांत नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्रोपचार केले.
रोटरी नॉर्थच्या सहकार्याने आयोजित या पथकाने १ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत अनेक गावांत नेत्र शिबिरे घेऊन उपचार व नेत्र जनजागरण केले.
परिसरातील डबडी, बहिरखेड, वारुळी, पडसोवळे, मजलापूर, कौलखेड, डाबकी रोड, बाळापूर, येळवण, दोनद, येवता, हिंगणी, चिंचोली, धाबा, आगीखेड, भूलगाव, देऊळगाव, शेगाव, टिटवान, कोथळी खुर्द, हातरुण येथील ग्रामपंचायत परिसरात मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या महिन्यात तब्बल २२ शिबिरे घेण्यात येऊन वरील गावांतील १,३३0 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ३७१ रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आले, तर ४१ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या मोतीबिंदू असणार्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
रोटरी फिरत्या नेत्र तपासणी अभियानाचे केंद्रप्रमुख डॉ. जुगल चिरानिया यांच्या मार्गदर्शनात सहायक राजीव मेसे, गोपाळ डाबेराव यांनी कार्य केले. सहकार्य रोटरी नॉर्थचे अध्यक्ष दीपक गोयनका, सचिव अविनाश डुडुळ, सहयोग समूहाचे डॉ. श्याम पंडित, देवेंद्र शाह, डॉ. ओमप्रकाश साबू, विजय ठोसर यांच्यासह गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मेहनत घेतली.