पंधरा दिवसांत पुन्हा सुरू होणार नेत्र शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:01 AM2021-06-13T11:01:12+5:302021-06-13T11:01:27+5:30

Eye surgery to resume in fortnight : कोविडची ही लाट ओसरू लागल्याने रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

Eye surgery to resume in fortnight! | पंधरा दिवसांत पुन्हा सुरू होणार नेत्र शस्त्रक्रिया!

पंधरा दिवसांत पुन्हा सुरू होणार नेत्र शस्त्रक्रिया!

Next

अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे नॉनकोविड वैद्यकीय सेवा पुन्हा प्रभावित झाली. त्यामुळे विविध शस्त्रक्रियाही रखडल्या. मात्र, आता कोविडची ही लाट ओसरू लागल्याने रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. त्या अनुषंगाने तयारीला सुरुवात झाली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत नेत्र शस्त्रक्रियांना पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच नॉनकोविड आजाराच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे रुग्णांचे आजार वाढू लागले. दरम्यान, कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर तीन महिन्यांच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये विविध शस्त्रक्रियांसोबतच नेत्र शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. सर्वकाही सुरळीत सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा काेविडची दुसरी लाट आल्याने नेत्र शस्त्रक्रिया पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या. सद्य:स्थितीत सुमारे ७०० पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया रखडल्याची माहिती आहे. सध्या कोविडची दुसरी लाट ओसरू लागल्याने शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहितीदेखील आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

नेत्र ओपीडीही होणार सुरू

शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यापूर्वी नेत्र ओपीडी सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून नेत्ररुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील नेत्रतज्ज्ञांनी दिली.

 

कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे बंद झालेला नेत्र शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

- डॉ. राजेश पवार, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला

Web Title: Eye surgery to resume in fortnight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.