डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प, ६०० पेक्षा जास्त ज्येष्ठांसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:04 AM2021-05-13T10:04:01+5:302021-05-13T10:04:10+5:30
Akola News : शासकीय रुग्णालयांमध्ये सुमारे ५००, तर खासगी रुग्णालयात १२००, अशा एकूण १७०० नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अकोला : कोविड रुग्णसंख्या वाढीचा नेत्र शस्त्रक्रियांना पुन्हा एकदा फटका बसला असून मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील नेत्रशस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत योग्य उपचारही मिळत नसल्याने सुमारे ६०० पेक्षा जास्त ज्येष्ठांसमोर अंधार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून विविध शस्त्रक्रियांप्रमाणेच नेत्र शस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. कोविडची पहिला लाट ओसरताच ऑक्टोबर महिन्यात नेत्र शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यामुळे १० फेब्रुवारीपासून सर्वोपचार रुग्णालयासह मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत शासकीय रुग्णालयांमध्ये सुमारे ५००, तर खासगी रुग्णालयात १२००, अशा एकूण १७०० नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नेत्र शस्त्रक्रियांना पुन्हा सुरुवात करणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
३५००
शासकीय रुग्णालयात कोरोनाआधी वर्षाला होणाऱ्या शस्त्रक्रिया
गत वर्षभरात झालेल्या शस्त्रक्रिया - ५००
नेत्र तपासणीही प्रभावित
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र वॉर्डासह मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातही कोविड रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे डोळ्यांचा बाह्यरुग्ण विभाग पूर्णत: ठप्प पडला आहे. त्यामुळे अनेकांच्या नेत्र तपासण्या प्रभावित झाल्या आहेत.
सुपरस्पेशालिटी सुरू झाल्यास नेत्र तपासणी सुरू होण्याची शक्यता
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात २५०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास नेत्र वॉर्डामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून नेत्रशस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत. मध्यंतरी ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान सुमारे ५०० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने १० फेब्रुवारीपासून शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रखडलेल्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.
- डॉ. राजेश पवार, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला