नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:33 AM2022-01-03T10:33:11+5:302022-01-03T10:35:39+5:30

Akola GMC : वर्षाच्या सुरुवातीलाच नेत्र प्रत्यारोपणाची यशस्वी सुरुवात झाल्याने नेत्रहिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Eye transplant marks the successful start of Akola GMC's eye bank! | नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात !

नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात !

Next
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी दोन नेत्र शस्त्रक्रिया आता नेत्र संकलन अन् प्रत्यारोपण जीएमसीतच शक्य

- प्रवीण खेते

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपणाने ‘नेत्रपेढी आणि केरोटोप्लास्टी’ची यशस्वी सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच अकोला जीएमसीला यासाठी शासनाची मान्यता मिळाली होती. वर्षाच्या सुरुवातीलाच नेत्र प्रत्यारोपणाची यशस्वी सुरुवात झाल्याने नेत्रहिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांमार्फत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘नेत्रपेढी आणि केरोटोप्लास्टी’साठी मान्यता दिली हाेती. त्यानंतर जीएमसी प्रशासनामार्फत दोन महिन्यांत नेत्रपेढी आणि नेत्र प्रत्यारोपणासाठी विशेष कक्षाची स्थापना करून नव्या वर्षात नेत्र प्रत्यारोपणाच्या दाेन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. जीएमसीच्या नेत्रपेढीमध्ये दोन नेत्र संकलित करून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये दोन गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया शक्य होणार आहे. नव्या वर्षात अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नेत्रहिनांसाठी ही रक्तपेढी दृष्टिदाता ठरणार आहे.

 

संकलित नेत्रांची साठवणूक आता अकोल्यातच

आतापर्यंत नेत्रदान शिबिरांतर्गत संकलित नेत्र जालना येथील नेत्रपेढीत पाठविण्यात येत होते.

मात्र, आता अकोला जीएमसीत नेत्रपेढी स्थापित झाल्याने संकलित नेत्रांची साठवणूक अकोल्यातच शक्य होणार आहे.

 

विदर्भातील चौथी नेत्रपेढी

अकोला जीएमसीतील नेत्र पेढी ही विदर्भातीच चौथी ठरली आहे.

यापूर्वी नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जीएमसीमध्ये नेत्रपेढीला मान्यता मिळालेली आहे.

 

जीएमसीसमोर नेत्र संकलनाचे आव्हान

कोरोना काळात रक्तदान शिबिरांसोबतच नेत्रदान शिबिरांनादेखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून जिल्ह्यात नेत्रदान शिबिरे शक्य झाली नाहीत. अशा परिस्थितीत नेत्रसंकलनासाठी नेत्रदान शिबिर आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या नेत्रसंकलनाचे मोठे आव्हान जीएमसीच्या नेत्रपेढीसमोर असणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच अकोला जीएमसीत ‘नेत्रपेढी आणि केरोटोप्लास्टी’ची स्थापना करण्यात आली असून, त्याची यशस्वी सुरुवात झाली आहे. नेत्र प्रत्यारोपणाच्या दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे अकोलेकरांना नेत्रप्रत्यारोपणासाठी आता खासगी रुग्णालयात किंवा जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नसणार आहे.

- डॉ. भावेश गुरुदासानी, संचालक, नेत्रपेढी, जीएमसी,अकोला

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेत्रपेढी सुरू झाली असून, आता अकोल्यातच नेत्र प्रत्यारोपणही शक्य झाले आहे. नेत्रहिनांना दृष्टी मिळावी यासाठी नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा.

- डॉ. मिनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

Web Title: Eye transplant marks the successful start of Akola GMC's eye bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.