शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
By Admin | Published: June 8, 2015 01:42 AM2015-06-08T01:42:19+5:302015-06-08T01:42:19+5:30
मशागत आटोपली, पेरणीसाठी जमीन तयार.
अकोला: पाऊस बरसताच यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असून, शेती पेरणीसाठी तयार आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत असून, डोळे आकाशाकडे लागले आहेत. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दोन्ही हंगामात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात चांगले उत्पन्न होईल, अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मॉन्सून ८ ते १२ जूनदरम्यान अकोल्यात दाखल होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे शेतकर्यांनी पेरणीसाठी शेती तयार केली आहे. डवरणी, नांगरणी करून पेरणीपूर्व मशागत आटोपण्यात आली आहे. जिल्हय़ात सरासरी ४ लाख ८२ हजार ६२0 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्या तुलनेत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार १00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७२ हजार ४00 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गत पंधरा दिवसांपासून भरउन्हात शेतकरी शेतात राबत होते. ४३ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानात शेतकरी शेतात काम करीत आहेत.