नरनाळा, असदगडचा चेहरामोहरा बदलणार - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 01:06 PM2020-03-11T13:06:36+5:302020-03-11T13:06:42+5:30
किल्ले नरनाळा व असदगडचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दिली.
अकोला: अकोट तालुक्यातील नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड किल्ला व परिसराचा विकास करण्यासाठी ९५ कोटी ३० लाख रुपयांच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले असून, विकास कामांद्वारे किल्ले नरनाळा व असदगडचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पात अकोट तालुक्यातील नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पुरातत्त्व विभागाचे मिलिंद अंगाईतकर, पर्यटन विभागाचे हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वुई थ्री डिझाइन स्टुडिओचे आयुष गुप्ता उपस्थित होते.
नरनाळा किल्ल्याची ओळख कायम त्याच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता किल्ले नरनाळा परिसर सुंदर-देखणा व शोभिवंत करण्याचे सांगत, उन्हाळ्यातही नरनाळा परिसर हिरवागार राहील, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नरनाळा परिसरात मेंढा गेट महाकाली गेट आणि राणी महलापर्यंत पर्यटकांसाठी पाऊलवाट निर्माण करण्याचे सांगत नरनाळा किल्ला विकासासोबतच पायथ्याशी असलेल्या शहानूर गावाचाही विकास करण्यात यावा. त्यासाठी स्थानिक आदिवासींना विश्वासात घेऊन, तेथील घरे व रस्त्यांचा विकास करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे खाद्य, वस्त्र, सण व त्यांची संस्कृती जपणारे गाव निर्माण करण्यात यावे आणि पर्यटकांसाठी रिसोर्ट निर्माण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विकास कामांसाठी निधीचे नियोजन!
नरनाळा विकास आराखड्यांतर्गत मंजूर ९५.३० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पुरातत्त्व विभागासाठी २३ कोटी, पर्यटन विभागासाठी १८ कोटी, वन विभागांतर्गत कामांसाठी ६२ लाख रुपये, बांधकाम विभागांतर्गत कामांसाठी ३९ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले. तसेच अकोला शहरातील असदगड किल्ला विकास कामांसाठी १३ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत सांगितले.