रेकॉर्ड न ठेवणे भोवले! कृषी केंद्रांचे नऊ परवाने कायमस्वरूपी रद्द; कृषी विभागाची कारवाई
By रवी दामोदर | Published: August 3, 2023 11:59 AM2023-08-03T11:59:16+5:302023-08-03T11:59:30+5:30
तीन कृषी केंद्रांना दिली ताकीद.
रवी दामोदर, अकोला
अकोला : यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबवली. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांकडून परवाना घेतल्यापासून व्यवहार न करणे, तसेच काही कृषी सेवा केंद्रांचे रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. अशा कृषी सेवा केंद्रांचे ९ परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तर तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली. शेतकऱ्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. यंदा काही ठिकाणी कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांची पाहणी केली असता त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांकडून रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आढळून आले आहे. तसेच परवाना घेतल्याच्या काळापासून एकही व्यवहार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून त्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करीत ९ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये बियाण्यांचे तीन, खतांचे दोन व कीटकनाशकांच्या चार परवान्यांचा समावेश आहे.
बाळापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद
कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत बाळापूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांच्या रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून त्या तीन कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.