बनावट कीटकनाशकांचा अकोल्यातून पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:49 PM2018-08-14T12:49:58+5:302018-08-14T12:51:41+5:30
अकोला: कंपनीने उत्पादित न केलेले कीटकनाशक मिसाइल व बॅव्हिस्टिन या उत्पादनांची यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांना अकोल्यातील महेश एंटरप्रायजेसमधून विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत पुढे आले.
अकोला: कंपनीने उत्पादित न केलेले कीटकनाशक मिसाइल व बॅव्हिस्टिन या उत्पादनांची यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांना अकोल्यातील महेश एंटरप्रायजेसमधून विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत पुढे आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील २२ कृषी केंद्र संचालकांवर कारवाई तर सर्वच केंद्रांची तपासणी करून साठा विक्री बंद करण्याचा आदेश पुणे येथील कृषी आयुक्तांनी दिला आहे.
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीने त्यांच्या कीटकनाशक उत्पादने बनावट पद्धतीने तयार करून विक्री केली जात असल्याची तक्रार केली. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे येथील कृषी आयुक्तांनी सर्व संबंधित जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २० ते २२ कृषी केंद्रातून या कीटकनाशकाची विक्री झाल्याचे पुढे आले. यवतमाळ व आर्णी येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला. त्याची दखल घेत तेथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपेकर, कृषी विकास अधिकारी के.एन. वानखडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याकडून आणलेल्या मिसाइल व बॅव्हिस्टिन या कीटकनाशकांची तपासणी करून तत्काळ विक्री बंद आदेश द्यावा, तसेच पुढील कारवाई करण्याचे पत्र दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात चौकशी सुरू झाली आहे.
- अकोल्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई
दरम्यान, अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी अकोला शहरातील महेश एन्टरप्रायजेसची चौकशी केली. तक्रारीनुसार संबंधितांकडून कागदपत्रे मागवित त्याची पडताळणी सुरू आहे. तर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी जी.आर. बोंडे यांनी कीटकनाशकाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.