बनावट फेसबूक अकाऊंटवरून महिलांना अश्लील संदेश
By Admin | Published: August 21, 2015 11:10 PM2015-08-21T23:10:44+5:302015-08-21T23:10:44+5:30
३0 बोगस सीमकार्ड वापरणारा आरोपी गजाआड; अकोल्यातील घटना.
अकोला : सुखवस्तू घरातील महिलांच्या नावाने बनावट फेसबुक खाते (अकाऊंट) तयार करून, तसेच बोगस सीमकार्डच्या आधारे व्हॉट्स अँपवर महिलांचे विविध ग्रुप तयार करून त्यांना अश्लील संदेश पाठविणार्या अकोल्यातील एका युवकास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. तब्बल २५ ते ३0 बोगस सीमकार्ड वापरणार्या या युवकास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लहान उमरी येथील अमोल ऊर्फ पिंटू खराबे याचा हिंगणा तामसवाडी येथील मुलीशी दोन वर्षांंपूर्वी विवाह झाला होता. या भामट्याने त्याचा साळा, सासरे यांच्या ओळखपत्रांचा वापर करून सीमकार्ड खरेदी केले. २५ ते ३0 सीमकार्ड खरेदी केल्यानंतर त्याने शहरातील एका बिल्डरच्या पत्नीच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंंग साईटवर खाते उघडले. या अकाऊंटच्या प्रोफाईलवर एक मोबाईल क्रमांकही टाकला. त्याच नंबरने व्हॉट्स अँपवर ग्रुप तयार करून त्याने काही महिलांना या ग्रुपशी जोडले. हळुहळू त्याने या महिलांसोबत संदेशांची देवाण-घेवाण सुरू केली. सुरूवातीला या महिलांना मोबाइल क्रमांक बनावट असल्याची शंका आली नाही. त्यामुळे त्यांनी संदेशांची देवाण-घेवाण सुरू ठेवली; मात्र काही दिवसानंतर आरोपीने अश्लील एसएमएस आणि एमएमएस पाठविणे सुरू केल्यामुळे ग्रुपमधील महिलांना संशय आला. रात्रभर ऑनलाईन राहून इतर महिलांशी चॅटिंग करणे, त्यांच्याशी अश्लील संभाषण करणे, हा त्याचा रोजचाच प्रकार झाला होता. दरम्यान, पीडित महिलेच्या काही मैत्रींणीना संशय आल्याने त्यांनी याबाबत पीडितेस विचारणा केली; मात्र तिने आपले फेसबुक किंवा व्हॉट्स अँपवर अकाऊंटच नसल्याचे सांगितल्यानंतर या महिलांना वस्तुस्थिती समजली. पीडित महिलेने हा प्रकार पतीच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे लहान उमरीतील अमोल खराबे याचा शोध लावून त्याला सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी अमोल खराबे याला अटक केली असून, त्याच्याकडून ३0 सीमकार्ड, मोबाईल व काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.
महिलेची बदनामी केल्यानंतर खंडणी
अमोल खराबे हा महिलांच्या नावावर बनावट फेसबुक खाते उघडून इतर महिलांशी अश्लील संदेश पाठवित होता. या संदेशांना इतर महिलांकडून उत्तर आल्यानंतर, तिला बदनामीचा धाक दाखवून खंडणीही वसूल करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. खराबेने आतापर्यंंत अनेक महिलांना अशा प्रकारे गंडविल्याची माहिती असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.