५00 रुपयांत बनावट बायको
By admin | Published: December 29, 2015 02:23 AM2015-12-29T02:23:17+5:302015-12-29T02:23:17+5:30
किडनी तस्करी प्रकरण; कोल्हटकरच्या पत्नीचा बनाव करण्यासाठी दिले ५00 रुपये.
अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये आणखी एक मनोरंजक व फसवणुकीचा अजबगजब किस्सा समोर आला आहे. देवेंद्र शिरसाट या आरोपीने पीडित संतोष कोल्हटकरच्या खर्या पत्नीऐवजी ज्या महिलेला पत्नीचा बनाव करायला लावले, तिला मोबदल्यात ५00 रुपये देण्यात आल्याचे समोर आले. किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित अमर शिरसाट व किडनी खरेदी करणारा जुने शहरातील रहिवासी संतोष कोल्हटकर, संतोष गवळी व शांताबाई खरात यांची किडनी काढून त्यांना मोबदल्यात तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीची तक्रार तिघांनीही पोलीस ठाण्यात केल्यानंतर तसेच ह्यलोकमतह्णने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने किडनी तस्करांच्या मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी, देवेंद्र शिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर किडनी तस्करी प्रकरणामध्ये प्रत्येक स्तरावर वापरण्यात आलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. किडनी तस्करीसाठी संतोष कोल्हटकर याची किडनी काढण्यापूर्वी त्याच्या पत्नीचे संमतिपत्र बनविण्यासाठी दुसर्याच महिलेला कोल्हटकरची पत्नी म्हणून ५00 रुपयांच्या मोबदल्यात उभे करण्यात आले होते. हा प्रकार सोमवारी उजेडात आला. दरम्यान, सदर महिलेचे बनावट मतदान कार्ड बनविणारा प्रशिक वानखडे याला स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. किडनी तस्करी प्रकरणातील तीन आरोपी कारागृहात असून, एक आरोपी ३0 डिसेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातील डॉक्टरांची नावे समोर आली आहेत; मात्र वरिष्ठ स्तरावरून पोलिसांवर दबाव येत असल्याने सदर डॉक्टरांना अटक करण्यास अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.