ठोक्याच्या शेतीला लागेना बोली!
By admin | Published: April 30, 2016 01:43 AM2016-04-30T01:43:37+5:302016-04-30T01:43:37+5:30
दुष्काळात शेतकरी संकटात; ठोक्यासाठी देणारा तयार; घेण्यास कोणी येईना समोर.
संतोष येलकर / अकोला
सतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि येत्या खरीप हंगामात पेरणीचा खर्च भागविण्याची चिंता सतावत असलेला शेतकरी शेती ठोक्याने देण्यास तयार असला तरी घेण्यास कोणी तयार नसल्याने ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. त्यामुळे यंदा 'ठोक्याच्या शेतीला लागेना बोली' अशी परिस्थिती जिल्हय़ातील गावागावात निर्माण झाली आहे.
हिवाळा संपताच ठोक्याच्या शेतीचे व्यवहार गावागावात सुरू होतात; परंतु गत तीन वर्षांच्या कालावधीत आधी अतवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट आणि गतवर्षी व यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला. पिकाचे उत्पादन झाले बुडाल्याने पैसा नाही, त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न एकूणच संसाराचा गाडा कसा चालवायचा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जवळ पैसा नसताना येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत, पेरणीसाठी बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
पेरणीचा खर्च करूनही शेतीचे उत्पादन मिळणार की नाही, याबाबत खात्री नसल्याने, जिल्हय़ातील गावागावात शेती ठोक्याने देण्यास शेतकरी तयार असला तरी, घेण्यास कोणी तयार नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी कोरडवाहू शेती १0 ते १२ हजार रुपये एकर आणि ओलिताची शेती १५ ते १८ हजार रुपये एकर दराप्रमाणे ठोक्याने केली जाते; परंतु दुष्काळी परिस्थितीत यावर्षी ठोक्याच्या शेतीचे भाव कमालीने घसरले आहेत. जिल्हय़ात सध्या ठोक्याच्या शेती व्यवहारामध्ये कोरडवाहू शेती प्रती एकर ३ हजार रुपये आणि ओलिताच्या शेतीला प्रती एकर ७ ते ८ हजार रुपये असा भाव मिळत आहे. भाव प्रचंड कमी असूनही, ठोक्याने शेती घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ात ठोक्याच्या शेतीला बोली लागत नसल्याची स्थिती आहे.