संपावरून खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट
By admin | Published: August 10, 2014 07:02 PM2014-08-10T19:02:40+5:302014-08-10T19:02:40+5:30
लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उपाहारगृह व कॅँ टीनवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
अकोला - शहरातील उपाहारगृह व कॅँ टीनमधील अस्वच्छता लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उपाहारगृह व कॅँ टीनवर धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात खाद्यपेय विक्रेता संघाने शुक्रवारपासून उपाहारगृह बंद ठेवून संप पुकारला होता. मात्र याच कारणावरून संघटनेत उभी फूट पडली असून, काहींनी शुक्रवारी रात्री आपले उपाहारगृह सुरू केले तर काही उपाहारगृह संचालकांनी आपली प्रतिष्ठाने शनिवारी दुपारनंतर उघडली. महापालिका प्रशासनाने उपाहारगृहांवर सीलबंद तसेच दंडात्मक कारवाई सुरू केली असून, या कारवाईला विरोध करण्यासाठी खाद्यपेय विक्रेता संघाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत खाद्यपेय विक्रेता संघातील काही सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने तसेच वर्चस्वाच्या कारणावरून खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट पडली आहे. संघटनेने आंदोलन सुरू करताना आयुक्त किंवा उपायुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संघटनेत एका गटाचे वर्चस्व वाढू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीच काही स्वीट मार्ट व हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर दुसर्या गटाने शनिवारी दुपारी आपली उपाहारगृह सुरू केली आहेत. सद्यस्थितीत एक खाद्यपेय विक्रेता संघटना कार्यरत असून, आता आणखी एका संघटनेने नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे खाद्यपेय विक्रेता संघटनेत फूट पडल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.