परतीच्या पावसाचा फूल शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:41 AM2017-10-17T01:41:58+5:302017-10-17T01:42:43+5:30
मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील फूल शेती धोक्यात आली आहे. विशेषत: दिवाळी सणाला महत्त्व असलेल्या झेंडू फुलांच्या शेतीला पावसाचा जबर फटका बसला. पर्यायाने झेंडू फुलाच्या उत्पादनावर परिणाम झाला. फूल उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील फूल शेती धोक्यात आली आहे. विशेषत: दिवाळी सणाला महत्त्व असलेल्या झेंडू फुलांच्या शेतीला पावसाचा जबर फटका बसला. पर्यायाने झेंडू फुलाच्या उत्पादनावर परिणाम झाला. फूल उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
पातूर शहरातील सुमारे २५0 ते ३00 एकर शेतीत फूल उत्पादक शेतकरी फूल शेती करतात. वर्षभर फुलांची शेती करणारे शेतकरी शहरात आहेत.
लिली, गिलाडी, गुलाब, शेवंती व झेंडू फुलासह अनेक फुलांचे उत्पादन घेतात. या सर्व फूल शेतीवर मुसळधार पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे फूल शेती धोक्यात आली.
फुलांमध्ये झेंडू फुलाला गणोशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांमध्ये प्रचंड मागणी असते. त्या दृष्टीने उपरोक्त सणांना झेंडू फुले उपलब्ध व्हावी, यासाठी फूल उत्पादक शेतकरी नियोजन करतात. यावर्षीसुद्धा शेतकर्यांनी नियोजन केले; परंतु यावर्षीच्या पावसाअभावी फूल शेती आधीच प्रभावित झाली, त्याचा परिणाम झेंडू फुलाच्या उत्पादनावर सुद्धा झाला.
दिवाळीचे नियोजन कोलमडले
दिवाळीसाठी झेंडूच्या उत्पादनासाठी शेतकर्यांनी नियोजन केले; परंतु मागील आठ दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसाने झेंडूच्या फुलांची झाडे सडून काळी पडू लागली. त्यासोबत फुलेसुद्धा सडून काळी पडली. त्यामुळे फूल उत्पादन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले व आता दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी बाजारात विकण्यासाठी फुले नाहीत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
मुसळधार पावसाने झेंडूची झाडे व फुले सडून सुकली. त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला. दिवाळीत विक्रीसाठी येणारी झेंडूची फुले आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले.
- संजय शिवराम फुलारी
फूल उत्पादक शेतकरी, पातूर
मुसळधार पावसाने पातूर शहरातील ९0 टक्के फूल शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत झेंडू फूल शेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे फूल उत्पादक शेतकर्यांना आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले.
- किशोर उगले
फूल उत्पादक शेतकरी, पातूर