कृषी विद्यापीठातील वित्त विभागात सावळा गोंधळ
By Admin | Published: April 11, 2017 01:47 AM2017-04-11T01:47:22+5:302017-04-11T01:47:22+5:30
आर्थिक वर्ष संपले तरी व्यवहार सुरूच : कार्यकारी परिषद सदस्यांनी मागितले स्पष्टीकरण
अकोला: आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन दहा दिवस झाले असले तरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वित्त विभागातून ३१ मार्चच्या तारखेची देयके राजरोसपणे काढली जात आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपी ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र दाणी यांच्याकडे विद्यापीठातील वित्त विभागात सुरू असलेल्या सावळ्य़ा गोंधळासंदर्भात सोमवारी तक्रार केली असून, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
देशासह राज्यातील आर्थिक व्यवहार पारदश्री व्हावे म्हणून शासनाने कॅशलेसला चालना दिली. आर्थिक व्यवहार ऑनलाइन केलेत. एकीकडे शासनाचे धोरण पारदश्री होत असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वित्त विभागातून मात्र एप्रिल महिन्यात मार्चचे देयक काढले जात असल्याचा आरोप आहे. डॉ. पंदेकृ विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी कुलगुरूंकडे तक्रार करून आर्थिक व्यवहार सुरू ठेवल्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
शासनाचा विविध विकासाचा निधी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३१ मार्चपर्यंत) खर्च व्हावा आणि अखर्चित निधी शासनाकडे परत पाठवावा, असा नियम आहे; मात्र बॅकडेटमध्ये आर्थिक व्यवहाराचा सावळा-गोंधळ सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो आहे.
विद्यापीठाच्या वित्त विभागाने ३१ मार्च १७ रोजी विद्यापीठाच्या निमंत्रक कार्यालयातून निर्गमित झालेल्या शेवटच्या धनादेशाचा क्रमांक व छायांकित प्रत द्यावी, तसेच अखर्चित व शासनाला परत पाठविलेल्या निधीबाबत माहिती द्यावी, असेही ठाकरे यांनी पत्रातून म्हटले आहे.
कृषिमंत्र्यांनी गोठविले कुलगुरूंचे अधिकार
डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र दाणी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्याने आणि अल्पावधीतच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी ३ एप्रिल रोजीच्या एका पत्रकान्वये कुलगुरूंचे अधिकार गोठविले आहे. यादरम्यान कोणतेही मोठे आर्थिक किंवा प्रशासकीय निर्णय घेऊ नये, असेही त्यास स्पष्ट केले आहे. याबाबत कृषी विद्यापीठाचे माहिती अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप तसे पत्र कार्यालयास मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक वर्षातील विविध बिल स्वीकारण्याची प्रक्रिया ३१ मार्च रोजी बंद झाली आहे. ट्रेझरीतून अजूनही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे रक्कम आल्यानंतर देयके दिले जात आहेत. यात सावळा गोंधळ नाही.
-विद्या पवार ,
नियंत्रक (कॅफो) डॉ.पंदेकृवी अकोला.