वीस वर्षापासून दूरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले, विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
By राजेश शेगोकार | Published: March 4, 2023 04:53 PM2023-03-04T16:53:10+5:302023-03-04T16:59:49+5:30
संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली. एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे.
अकोला : वडिलाेपार्जित संपत्तीच्या वादात भाऊ-बहीण, आई आणि मुलगी एकमेकांच्या विरोधात कार्टात गेले, वाद विकाेपाला गेल्याने संवाद बंद झाला, वाद संपतील अन् पुन्हा पूर्वी सारखे हाेईल ही आशा काेणालाच नव्हती उलट राग, द्वेषाची जागा वैमनस्याने घेतली हाेती अशा स्थितीत या परिवारातील एका सदस्याला विधी सेवा प्राधिकारणाच्या रूपाने एक आशेचा किरण दिसताे, ताे पुढाकार घेताे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश पैठणकर हे या परिवारातील गुंता साेडविण्यासाठी पुढे येतात अन् त्यांच्या समुपदेशनाद्वारे तब्बल २० वर्षापासून विखुरलेला परिवार एकत्र येताे.
संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली. एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे.
अकोला जिल्ह्यातील एका गावातील प्रतिष्ठित कुटुंब असलेले भाऊ-बहीण, आई आणि मुलगी संपत्तीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. जिल्हा न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी खटले सुद्धा दाखल केले होते. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते एकमेकांचे वैरी बनले होते. बहिण भावाच्या पवित्र नात्याला कधीचाच सुरुंग लागला होता तर मुलाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई आपल्या पोटच्या गोळ्यापासून कधीच दूर झाली होती. तीन भाऊ दोन बहिणी आणि आई वडील असा हा परिवार आहे. यापैकी वडीलाचे आधीच निधन झाले तर घरातील कुटुंबप्रमुख असलेल्या आईचे सुद्धा आजाराने निधन पैठणकर एका कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांनी घरगुती वादविवाद कसे मिटवावीत ? याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच ज्या लोकांना असे तंटे सोडवण्यासाठी मदत हवी असेल तर त्यांनी संपर्क करावा अशी आवाहन केले होते. हाच धागा पकडून या विखुरलेल्या कुटुंबातील एका सदस्याने पैठणकर यांच्याशी संपर्क साधला व अश्रू भरल्या नयनांनी आपली कहाणी कथन केली. त्यांने सांगितले की, आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी असून आई वडील देवा घरी गेले आहेत.
मात्र संपत्ती व कौटुंबिक करण्यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षापासून एकमेकांसोबत बोलत नाही. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश पैठणकर यांनी या कुटुंबाला जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात बोलावले. या सर्व मंडळींना कायदेशीर मार्गदर्शन केले. वाद विवादामुळे कुटुंब कसे उध्वस्त होतात, याबाबत त्यांनी जाणीव करून दिली. तुम्ही सर्व भावंडांनी पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अनमोल मार्गदर्शन केले आणि या भावंडांना हा सल्ला पटला. अखेर तीन भाऊ आणि दोन बहिणींनी एकमेकांना मिठी मारली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी आनंदाला वाट मोकळी करून दिली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग नुकताच विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामध्ये अनेकांनी अनुभवला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे या भावंडांनी आभार मानले.