विदर्भातील प्रसिद्ध पानवेली देशात फुलणार : अकोट येथे संशोधन केंद्र ; क्षेत्र वाढीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:32 AM2018-01-23T00:32:09+5:302018-01-23T00:32:58+5:30
अकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्या पानवेली मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्या पानवेली मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.
पानवेली हे नगदी बहुवर्षीय वेलवर्गीय पीक असून, विदर्भातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर जिल्हय़ात पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते. अकोट तालुक्यात कपुरी व बंगला या दोन जातीची लागवड शेतकरी करतात, या प्रसिद्ध पानांची देशात मागणी असून, एका एकरात १२ ते १५ लाख रुपये उत्पादन होत असल्याचा कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे.
अकोला जिल्हय़ातील अकोट तालुका व अमरावती जिल्हय़ातील अंजनगाव भागात पाच हजार हेक्टरवर पानवेलीचे क्षेत्र होते. तथापि, तीव्र पाणी टंचाई, कृषी यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने आता हे क्षेत्र घटले असून, सध्या काही शेतकर्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे पानवेलीचे १.६४ हेक्टर क्षेत्र टिकून आहे. याच क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी देवठाणा पानवेली संशोधन केंद्र बळकट क रण्याचा निर्णय घेतला असून, पूर्व विदर्भातील संशोधन केंद्र दिवठाणा केंद्राला जोडले जाणार.
कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान विकसित
संशोधन केंद्रात कमी खर्चाचे लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित केले जाणार असून, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन संशोधन केले जाईल, तसेच रोग प्रतिबंधक जाती विकसित केल्या जातील. सिंचन, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान विकासावर भर दिला जाईल. उत्पादकता व पानाची साठवण क्षमता वाढविणे, तसेच औषध गुणधर्माचा अभ्यासही होईल.
पानवेलीत औषध गुणधर्म
नागवेली, पानवेलीच्या पानात अ,ब व क जीवनसत्व विपूल प्रमाणात असून,पानामध्ये पाचन, मुखशुद्धी, शक्ती, कामवर्धक औषध गुणधर्म आहेत, तसेच डोके दुखणे, वात, हृदयकळा यासाठी उपयोग केला जातो. धार्मिक प्रसंगात या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
औषध गुणधर्म असलेल्या कपुरी, बंगाली पानाला मागणी असून, बाजार भाव चांगले आहेत. संशोधन केंद्राचे बळकटीकरण झाल्यास खारपाणपट्टय़ातील पानमळ्य़ांचा विकास व क्षेत्र वाढीवर भर दिला जाईल. शेतकर्यांना कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान पुरविण्यात येईल.
डॉ.एम.एस. जोशी,
प्रमुख, पानवेली संशोधन केंद्र, डॉ. पंदेकृवि,
दिवठाणा, ता. अकोट, जि.अकोला.