ओळखीच्या व्यक्तीने केले दागिने लंपास!
By admin | Published: July 17, 2017 03:15 AM2017-07-17T03:15:47+5:302017-07-17T03:15:47+5:30
२० दिवसांनी घटना उघडकीस: गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परिचयातील व्यक्तीने सराफा दुकानामध्ये येऊन, दुकानदाराचे लक्ष विचलित करून दुकानातील ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने २८ जून रोजी लंपास केले होते. दुकानदाराने सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची शनिवारी मोजदाद केल्यावर दुकानातील दागिने लंपास झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
राऊतवाडीत राहणारे ऐश्वर्य प्रकाश पाचकवडे (२४) यांचे सराफा दुकान आहे. २६ जून रोजी त्यांच्या दुकानामध्ये परिचयातील एक व्यक्ती आला. गप्पागोष्टी करताना, सराफा दुकानदाराचे लक्ष कामात असल्याचे पाहून त्याने दुकानातील ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने गुपचूपपणे लंपास केले. आपल्या दुकानातून सोन्याचे दागिने लंपास झाल्याची जराशी कल्पना सराफा दुकानदाराला आली नाही; परंतु शनिवारी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची मोजदाद केली. तेव्हा दुकानातील २ लाख २९ हजार रुपये किमतीचे ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार अन्वर शेख यांनी त्यांच्याकडून २६ जून रोजी दुकानात कोण कोण आले होते, याची माहिती जाणून घेतली. काही व्यक्तींची नावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोळा चौकात राहणारा सचिन चौधरी याचे नाव समोर आले. २६ जून रोजी तो सराफा दुकानात आला होता. त्यानंतर तो गायब झाला. पोलिसांचा संशय वाढल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
--