वाढदिवस साजरा न करता दिले वृद्धाश्रमाला पंखे भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:40+5:302021-05-03T04:13:40+5:30
मूर्तिजापूर : येथील महात्मा फुले वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेऊन ‘लोकमत’ने त्यांच्या भावना जाणून घेऊन ‘भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा ...
मूर्तिजापूर : येथील महात्मा फुले वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेऊन ‘लोकमत’ने त्यांच्या भावना जाणून घेऊन ‘भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच समाजातील हात पुढे येऊ लागले आहेत. येथील प्रा. गजानन वरघट यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करता वृद्धाश्रमाला पंखे भेट देऊन खाद्यपदार्थ वाटप केले.
येथील महात्मा फुले वृद्धाश्रमाला दि. १८ एप्रिल रोजी भेट देऊन तेथील वृद्धांच्या भावना जाणून दि. १९ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच समाजमन जागृत होऊन वृद्धाश्रमाला विविध माध्यमातून मदत व्हायला लागली आहे. येथील प्रा. गजानन वरघट यांनी अडगळीत असलेल्या वृद्धाश्रमाला भेट दिली असता तेथील वृद्धाची उन्हामुळे गर्मीने होत असलेली जिवाची घालमेल व कासावीस झालेला जीव बघून त्यांनी वाढदिवसावर खर्च न करता वृद्धांसाठी दोन छताच्या पंख्यांची व्यवस्था करून उपस्थित वृद्धांना खाद्यपदार्थ वाटप करीत वाढदिवस साजरा केला. त्याच्यासोबत पत्रकार संजय उमक, विलास वानखडे, रवि गोडकर, दिनेश श्रीवास व अक्षय वानखडे आदी उपस्थित होते.