शेतजमीन भेगाळली!
By admin | Published: July 7, 2015 01:45 AM2015-07-07T01:45:43+5:302015-07-07T01:45:43+5:30
भर पावसाळ्य़ात शेतातील ओलावा नष्ट; तापमानात वाढ.
अकोला : राज्यात पाऊस नसल्याने शेतातील ओलावा नष्ट झाला असून, जमीन आकुंचन पावल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांसमोर पुन्हा हे नवे संकट उभे ठाकले आहे. जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर राज्यातील शेतकर्यांनी ४५ ते ५0 टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी केली असून, ही पिके अंकुरली आहेत. परंतु अचानक पावसाने दडी मारली आणि उष्णतामानातही प्रचंड वाढ झाल्याने शेतातील ओलावा कमी झाला. परिणामी शेतात प्रचंड भेगा पडल्या असून, जमीन कडक झाली आहे. शेतजमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत गरम हवा अर्थात तापमान शिरत असल्याने खरीप हंगामातील अंकुरलेली पिके वाळली आहेत. खरे तर उन्हाळ्य़ात जमीन फाकण्याचे प्रकार घडतात, पण सध्या पावसाळय़ात जमीन फाकण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी या नवीन संकटाने हवालदिल झाला आहे.यंदा जून महिन्यातील दहा दिवस पूर्व विदर्भात बर्यापैकी पाऊस कोसळला; पण पश्चिम विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाचा जोर नव्हता. या विभागांना सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहेच; याच बरोबर संपूर्ण राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पाऊस आला तरी उशिरा पेरणी करावी लागणार असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.