शेतकरी आंदोलनाची धग कायमच!
By admin | Published: June 7, 2017 01:34 AM2017-06-07T01:34:20+5:302017-06-07T01:34:20+5:30
अकोला : शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात सुरु झालेल्या आंदोलनाची धग मंगळवारीही कायम होती.शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात सुरु झालेल्या आंदोलनाची धग मंगळवारीही कायम होती. मूर्तिजापूर, अकोट, तेल्हाऱ्यासह अकोल्यात शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. बाजारपेठेत अजूनही शेतमालाची आवक कमी असून त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या भाववाढीवर झाला आहे.
अकोटात शेतकरी पुत्रांचे मुंडण आंदोलन
अकोट: शेतकरी संपावर असताना विविध आंदोलने पेटली आहेत. अशातच अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून ६ जून रोजी शिवाजी चौकात मुंडण आंदोलन केले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात युवा पिढीनेसुद्धा उडी घेतली आहे. शेतकरी संप शासनाला गांभीर्याने अद्यापही कळला नसल्याने आंदोलनाचे प्रमुख राम म्हैसने यांच्यासह युवकांनी शिवाजी चौकात मुंडण करून आंदोलन केले. शासनाच्या भूमिकेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी ज्ञानू कुलट, दत्ता वाघ, गजानन डांगे, गोपाल वाघ, बबलू मोहोकार, कैलास म्हैसने, संतोष वसू, गोपाल चिकटे, बाळासाहेब नाठे, अजाबराव वानखडे, शुभम देशमुख, अल्पेश दुधे, वैभव पोटे, गौरव डोबाळे, ऋषिकेश चावरे, विपुल ठाकरे, वैभव डिक्कर, प्रफुल्ल म्हैसने, श्याम वाघ, भूषण झापर्डे, ज्ञानेश्वर रेठे, रितेश उजिळे, अक्षय मोरे, विजू लिल्लारे, अक्षय रावणकार, गणू भावे, योगेश डोबाळे, संदीप डोबाळे, धीरज नाथे, आदेश खोकले, रजत राठी, वैभव मोरे, मुन्ना म्हैसने, अर्जुन लासूरकर, विलास भोजने, महेश काळे यांची उपस्थिती होती.
मूर्तिजापूर : बाजार बंद
मूर्तिजापूर: शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून मूर्तिजापूर येथे मंगळवार ६ जून रोजी बाजार बंद करण्यात आला. या आंदोलनात दूध व कांदे रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनास शेतकरी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी स्वत:चे व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला. या प्रसंगी अनेकांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन शेतकरी कामगार पक्षाचे विजय गावंडे यांनी केले. प्रगती शेतकरी संघटनेचे राजूभाऊ वानखडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिवसेनेचे विनायक गुल्हाने, शरद भटकर, अप्पू तिडके आणि शेतकरी संघटनेचे विजय लोडम, बाळासाहेब तायडे, गुरुदेव सेवा मंडळाचे माधव काळे, कापूस उत्पादक संघाचे रमेशभाऊ देशमुख, प्रगती शेतकरी संघटनेचे देवीदास बांगड, ग्राहक मंचाचे प्रकाशसिंग राजपूत, जीवन ढोकणे, सेवकराम लहाने व प्रा. सुधाकर गौरखेडे (जनमंच) यांनी मार्गदर्शन केले. अरुणभाऊ बोर्डे, सेवकराम लहाने, शरद बंग, नीलेश मालधुरे, स्वप्निल देशुमख, कैलास साबळे, नितीन गावंडे, सागर ढोरे, मुन्ना नाईकनवरे, गोपाल तायडे, प्रदीप तायडे, मंगेश बेलसरे, प्रफुल्ल मालधुरे, देवानंद डहाके इत्यादींनी परिश्रम घेतले. अशरफभाई, खलीलभाई, फारुखभाई, माणिकराव खरबडकार, शेरखा तजमुलखा, तस्लीम खा, विनोद उमाळे, सुधाकर टाक, गोविंद नगरे, मुन्ना दुबे, संदीप बोळे या व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून आंदोलनात भाग घेतला.
हिवरखेड येथे मोर्चा
हिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे ६ जून रोजी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढला.हिवखेड येथे मंगळवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शिवसैनिक, शंभुभक्त सेना व छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर मोर्चा मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत ‘शेकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’, स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करा, अशा व इतर घोषणांच्या निनादात सोनवाडी स्टॉपपर्यंत आला. सोनवाडी स्टॉपवर शेतकरी व शिवसैनिकांनी सरकारचा निषेध नोंदवत फळे व भाजीपाला रस्त्यावर टाकून दिला. यावेळी शेतकरी व शिवसेनेचे पुरुषोत्तम गावंडे, अर्जुन गावंडे, अभिषेक धांडे, राजेश भोपळे, विशाल कोकाटे, अजय नवले, सागर मानकर, अंकुश निळे, गणेश ठाकरे, राहुल वाणे, आकाश इंगळे, मंगेश मोरोकार, पंकज देशमुख, दिनेश पिसोळे, सुनील नवले यांच्यासह शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
टाळे ठोकण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून अकोल्यात मंगळवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते; मात्र तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी घोषणा देत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी प्रशांत गावंडे, प्रकाश मानकर, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.