शेतक-याला मागितली सिंचन विहिरीसाठी लाच!

By admin | Published: June 15, 2016 02:03 AM2016-06-15T02:03:01+5:302016-06-15T02:03:01+5:30

रिसोड पंचायत समिती शाखा अभियंत्यासह तिघांविरूद्ध एसीबीची कारवाई.

Farmer asked for bribe for irrigation well! | शेतक-याला मागितली सिंचन विहिरीसाठी लाच!

शेतक-याला मागितली सिंचन विहिरीसाठी लाच!

Next

वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे खोदकाम व बांधकामाची उर्वरित रक्कम मिळण्याकरिता शेतकर्‍याला ६५00 रुपयांची लाच मागणार्‍या रिसोड पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यासह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १४ जून रोजी दुपारच्या सुमारास रिसोड पंचायत समिती परिसरात कारवाई केली. शाखा अभियंता तेजराव तुकाराम जाधव, तांत्रिक अधिकारी मंगेश भारत जाधव व रोजगार सेवक माणिक रामभाऊ अवचार अशी आरोपिंची नावे आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील तक्रारदार शेतकर्‍याने रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान तत्त्वावरील सिंचन विहिरीचा लाभ घेतला. या सिंचन विहिरीकरिता तीन लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याने तक्रारदाराने विहिरीचे खोदकाम व बांधकाम सुरू केले. याकरिता शासनाकडून आतापर्यंत एक लाख ८५ हजार रुपये धनादेशाद्वारे मिळाले आहेत. एप्रिल २0१६ मध्ये विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्याने पंचायत समिती रिसोड येथे उर्वरित एक लाख १५ हजार रुपये मिळणेकरिता विहीर खोदकाम व बांधकामाचा प्रस्ताव रिसोड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सादर केला. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेत १५ दिवस गेले. अनुदान काढून देण्याकरिता शाखा अभियंता तेजराव जाधव, तांत्रिक अधिकारी मंगेश जाधव, रोजगार सेवक माणिक अवचार यांच्याकडे विचारणा केली असता, उपरोक्त तिघांनी लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार शाखा अभियंता जाधव यांनी तीन हजार, तांत्रिक अधिकारी जाधव यांनी १५00 रुपये आणि रोजगार सेवक अवचार याने दोन हजार रुपये लाच मागितल्याचा आरोप तक्रारदार शेतकर्‍याने केला. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान शाखा अभियंत्यांसह तिघांनी लाच मागितल्याची खात्री पटल्याने सापळा रचण्याचे ठरले. मंगळवारी दुपारच्या सुमारास रिसोड पंचायत समिती परिसरात सापळा रचण्यात आला. मंगेश जाधव यांनी तेजराव जाधव यांचे तीन हजार आणि स्वत:चे १५00 रुपये असे ४५00 रुपये आणि माणिक अवचार याने दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. शाखा अभियंता तेजराव जाधव हे फरार असून, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ए.जी. रुईकर, पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्‍हाडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Farmer asked for bribe for irrigation well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.