अकोला : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 05:46 PM2018-03-01T17:46:24+5:302018-03-01T17:46:24+5:30
सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विविध संकटाच्या चक्रव्युहात गुरफटून गेल्याने मागील महिनाभरात चोहोगावमधील तीन शेतकºयांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे चोहोगाव हादरून गेले आहे.
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या सखाराम गंगाराम बहाकार (५५) या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. सखाराम बहाकार यांनी ‘बटाई’ पद्धतीने पेरलेल्या भाजीपाल्याच्या शेतातच दोन दिवसांपुर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. सखाराम बहाकर याच्या नावाने चोहोगाव शेतशिवारात सव्वा एकर शेतजमीन असून त्यावर जिल्हा बँकेच्या धाबा शाखेचे पीककर्ज आहे. यासह तीन मुलींच्या लग्नासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले खाजगी कर्जही आहे. चार वर्षापासून शेतात उत्पादन झाले नाही. शेती तोट्यात करण्याची वेळ आली. त्यामुळे बहाकर यांनी यंदा दुसºयाच्या शेतात बटाईने भाजीपाला पेरला होता. त्यांचा मुलगा शाळेतून आल्यावर गावात भाजीपाला विकायचा. इतकेच नव्हे तर शेतातून रखवाली करून घरी आल्यावर सखारामही सकाळी व सायंकाळी भाजीपाला विकायचा. तथापि , कवडीमोल भावामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या चिंतेतच सखाराम बहाकर यांनी शेतातच कीटकनाशक घेतले.
२५ एप्रिलला ठरले रुपालीचे लग्न
सखाराम बहाकर यांची मुलगी रुपालीचे २५ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. लग्न घरीच असल्यामुळे त्याचे नियोजन व इतर खर्चाची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंतासुद्धा त्यांना लागली होती. यापूर्वी तीन मुलींची लग्ने केली. त्याचे कर्ज अजूनही फिटली नाहीत. तोच शेवटच्या मुलीचे लग्न बार्शीटाकळी तालुक्यातील वस्तापूर (वाघा) येथील छगन उत्तम येवले यांच्यासोबत ठरले आहे. आता सखाराम यांच्या मृत्युमुळे या लग्नाची जबाबदारी पत्नी व एकुलत्या एक मुलावर आहे.
चार वर्षापूर्वी भावानेही केली होती आत्महत्या
चार वर्षापूर्वी सखाराम बहाकर यांचे भाऊ गजानन गंगाराम बहाकर या अल्पभूधारक शेतकऱ्यानेसुद्धा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती.