शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू: प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:35+5:302020-12-15T04:34:35+5:30

खेट्री : येथून जवळच असलेल्या पांगरताटी येथे शेतकरी व शेतमजूर शेतात फेरफटका मारीत असताना शेताच्या सीमेवर लावण्यात आलेल्या तारेचा ...

Farmer dies of shock: Attempt to suppress case! | शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू: प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !

शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू: प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !

Next

खेट्री : येथून जवळच असलेल्या पांगरताटी येथे शेतकरी व शेतमजूर शेतात फेरफटका मारीत असताना शेताच्या सीमेवर लावण्यात आलेल्या तारेचा स्पर्श होऊन दोघांना विजेचा शॉक लागला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणात महावितरणने शेतमालकाविरुद्ध तक्रार देण्याऐवजी जखमी झालेल्या दोघांविरुद्ध तक्रार दिल्याचा आरोप मृत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणात चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

दशरथ कडणू शेळके (४५), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पांगरताटी येथील दशरथ शेळके व त्याची पत्नी नर्बदा शेळके हे दोघे ९ डिसेंबर रोजी रात्री पिकांच्या संरक्षणासाठी शेतात राखणीला गेले होते. शेजारील शेतात राखणीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने दशरथ शेळके यांना बोलावले. ते दोघे वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षणासाठी शेतात फेरफटक्यासाठी निघाले असता शेताच्या सीमेवर लावलेले विद्युत तारेचा शॉक लागून दोघे जण गंभीर झाले. घटनेची माहिती मिळताच ज्या शेतकऱ्याने विद्युततारा लावलेल्या होत्या, त्या शेतमालकाने त्यांच्या नातेवाइकांना माहिती न देता परस्पर उपचारासाठी दोघांना अकोला येथे नेले. त्यानंतर मध्य रात्री नातेवाइकांना माहिती दिली, असा आरोप मृत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी केला आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना नागपूर येथे हलविण्यात आले होते. ११ डिसेंबर रोजी दशरथ शेळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महावितरण विभागाने शेतमालकाऐवजी गंभीर झालेल्या दोघांविरुद्ध चान्नी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच ‘प्रहार’चे माजी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद पाटील यांनी कार्यकर्त्यांसह १३ डिसेंबर रोजी मृत शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन सात्वन केले. दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, तसेच ठाणेदारासोबत चर्चा केली.

-------------------

प्रतिक्रया

महावितरण विभागाच्या संबंधितांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौकशीअंति पुढील कारवाई करण्यात येईल.

-राहुल वाघ, ठाणेदार, पोलीस स्टेशन, चान्नी

----------------

ते दोघे जण विद्युतची चोरी करून शिकार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करीत आहे.

पी. ए. गुहे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती

----------------------

Web Title: Farmer dies of shock: Attempt to suppress case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.