एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:31 AM2019-11-05T11:31:52+5:302019-11-05T11:38:00+5:30
सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
- राहूल सोनोने
दिग्रस बु.: गुडघ््यापर्यंत चिखल, ठिकठिकाणी पाणी, त्यातून ३० ते ३५ किलो सोयाबीन गठ्ठे डोक्यावर घेऊन जात असलेले शेतकरी, असे चित्र दिग्रस बु. सह पातूर तालुक्यात दिसत आहे. सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पातूर तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे उभ्या पिकांना कोंब फुटले आहेत. शेतरस्त्यावर चिखल साचल्याने शेतकºयांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत आहे. एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल डोक्यावर वाहून शेतकरी घरी आणत आहे.
पातूर तालुक्यातीन अनेक शेतकºयांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवले होते. या सोयाबीनला सततच्या पावसामुळे कोंब फुटले आहेत. पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शेती मशागतीची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी उसंत देताच दिग्रस बु. परिसरात शेतकºयांनी शेतात धाव घेतली. तालुक्यातील सर्वच शेतरस्त्यांवर चिखल साचल्याने बैलगाडी तर दूरच साधे चालताही येत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शेतकरी एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल घरी आणत आहेत. पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित ३० टक्के सोयाबीन घरी आणण्यासाठी चिखल तुडवावा लागत आहे.
खर्चही वाढला
पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तसेच दर्जाही घसरला आहे. अशा स्थितीत या सोयाबीनला चांगला भाव मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. शेतात पडून असलेला शेतमाल घरी आणणे शेतकºयांना शक्य नाही. त्यामुळे मजूर लावून हा माल घरी आणण्यात येत आहे. चिखल व पाण्यात जाण्यासाठी मजूर वेगळी मजुरी मागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. भावाची शाश्वती नसताना शेतकरी हा खर्च करीत असल्याने आणखी एक संकट शेतकºयांवर आले आहे. परिसरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी राहुल गावंडे, रामा गावंडे आदींनी केली आहे.