शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीचा जागर

By admin | Published: April 24, 2017 01:57 AM2017-04-24T01:57:55+5:302017-04-24T01:57:55+5:30

कर्जमुक्तीसाठी आंदोलन: जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती १ मे ला घेणार कर्जमुक्तीचा ठराव

Farmer Jagar Forum has released the entire debt waiver | शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीचा जागर

शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीचा जागर

Next

अकोला : शेतकरी राजा आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यात शासनाने तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांना संकटात लोटले आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी कायदा असूनही शेतमालाचे भाव पाडले जातात. मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाल्यानंतरही शासनाने लाखो टन तुरीची डाळ आयात केली. शासनाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन संपूर्ण कर्जमुक्तीसाठी लढा द्यावा, यासाठी शेतकरी जागर मंचच्यावतीने कर्जमुक्तीचा जागर करून १ मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कर्जमुक्तीचा ठराव घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज तायडे, प्रशांत गावंडे यांनी रविवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी जिल्ह्यातील सरपंचांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसह नाफेडने बंद केलेली तूर खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गत तीन वर्षांपासून सततचा दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला. यंदा पीक परिस्थिती सुधारली. मात्र, शासनाने व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतमालाचे भाव पाडले. बँकांकडून सक्तीची कर्जवसुली करण्यात येत आहे. शासन केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. गतवर्षी ८ ते १३ हजार रुपयांपर्यंत तूर, हरभऱ्याचे भाव वाढले होते. शासनाने कडधान्य घेण्याचे आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा वाढवला. तूर, मूग, हरभऱ्याचे उत्पादन अधिक झाले; परंतु शेतमालाला चार हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. शासनाने सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. बँकांमध्ये आमच्या हक्काचे पैसेच आम्हाला मिळत नाहीत. लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. भाजप शासनाने दोन वर्षांपासून दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोलच्या प्रत्येक लीटरमागे सहा रुपयांप्रमाणे अधिभार जनतेकडून वसूल केला; परंतु त्यातील एकही पैसा दुष्काळग्रस्तासाठी खर्च केला नाही. पेट्रोलच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जमा झालेले चौदा हजार कोटी रुपये कुठे गेले? याचे उत्तर शासनाकडे नाही, असा आरोपही शेतकरी जागर मंचातर्फे करण्यात आला. शासनाला जागे करण्यासाठी शेतकरी जागर मंचातर्फे १ मे रोजी सर्व ग्रामपंचायतींना संपूर्ण कर्जमुक्तीचा ठराव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जमुक्तीचा ठरावानंतर शेतकरी जागर मंचतर्फे संपूर्ण कर्जमुक्तीसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असेही शेतकरी जागर मंचतर्फे स्पष्ट करण्यात आले. पत्रपरिषदेला जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, काशीराम साबळे, टिना देशमुख, राजेश मंगळे उपस्थित होते.

शेकडो शेतकरी, सरपंचांची उपस्थिती
शेतकरी जागर मंचच्या बैठकीला जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, सरपंच, उपसरपंचांनी हजेरी लावली. यात शिवाजी म्हैसने, सुनील गोंडचवर, किशोर कुकडे, दिलीप मोहोड, मुरलीधर पुरंगे, भास्कर वानखडे, मोहन मते, विजय के. देशमुख, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर मानकर, संतोष झाकर्डे, मंगेश मांगटे, वासुदेव कुचर, माणिक इंगळे, राजू पंडित, प्रशांत फुरंगे, उषा गवई, संतोष इंगळे, गजानन हरणे, बाळ मुरूमकार, गजानन पारधी, राजेश खोडके, सम्राट डोंगरदिवे यांचा समावेश आहे.

Web Title: Farmer Jagar Forum has released the entire debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.