शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका
By प्रवीण खेते | Published: February 16, 2023 02:51 PM2023-02-16T14:51:43+5:302023-02-16T14:54:28+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून १० फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
अकोला: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्यांच्या आई आणि पत्नी यानी तुपकरांचे औक्षण केले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेवून जल्लोश करत अशोक वाटीकापर्यंत मिरवणुक काढली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून १० फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर हे आत्मदहन करण्यासाठी आले होते. पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी तुपकरांनी केला होता. प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप ही त्यांनी केला होता.
आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह २८ आंदोलनकांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना १५ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली होती. गुरूवारी रविकांत तुपकर यांची अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी यांच्या पत्नी आणि आईने औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.